लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्यासाठी जिल्ह्यात सर्वेक्षकांच्या मदतीने गाव पातळीवर १५ वर्षांपुढील व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. मुख्याध्यापकांच्या मदतीने दोन दिवसात सर्वेक्षकांची निवड करून पुढील पंधरवड्यात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नवभारत साक्षरता कार्यक्रमासंदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हास्तरीय नियामक परिषदेचे सदस्य सचिव भगवान फुलारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी (योजना) आर. आर. बोडके आदी उपस्थित होते. साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवर काटेकोरपणे सर्वेक्षण करावे, असे शर्मा यांनी सूचित केले.

आणखी वाचा-नाशिक: अल्प दरात विमान तिकीटाच्या आमिषाने भुर्दंड, दहा विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

गाव पातळीवर करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी मुख्याध्यापकांच्या मदतीने सर्वेक्षकांची निवड करून त्यांची यादी दोन दिवसात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर हे सर्वेक्षण पूर्ण करण्यास १५ दिवसांची मुदत घालून देण्यात आली आहे. शिवाय, ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात जे लोक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची देखील माहिती घ्यावी. सर्वेक्षण करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक यांना दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली.

आणखी वाचा-नाशिक: अल्प दरात विमान तिकीटाच्या आमिषाने भुर्दंड, दहा विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

वर्षभरासाठी २८ हजार २५३ जणांचे उद्दिष्ट्य

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात २८ हजार २५३ इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ५३ लाख ८९ हजार २६० रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. याबाबतची माहिती बैठकीत प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. आर. बोडके यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अमलबजावणीसाठी नीप ॲपवर सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची नोंदणी करण्यात आली आहे. तालुका आणि शाळानिहाय निश्चित केलेल्या निरक्षर उद्दिष्टाप्रमाणे स्वंयंसेवकांची निवड करण्यात आल्याचे बोडके यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discovery of illiterates at village level navbharat literacy mission mrj
Show comments