नाशिक – निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस महत्वपूर्ण भूमिका बजावत असतांना सिडको परिसरातील विखे पाटील शाळेतील मतदान केंद्रात पोलिसांच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला. केंद्रातील शिंदे गटाच्या सदस्याला जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी थांबवून समज दिली. या प्रकारानंतर केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला. जादा पोलीस कुमक मागविण्यात आली.
हेही वाचा >>> नाशिक : केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांद्याच्या माळा घालून मतदान
सिडको येथील विखे पाटील शाळेतील केंद्रात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचे प्रतिनिधी काम करत होते. दुपारी त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी दोन अल्पवयीन मुले त्या ठिकाणी आले. केंद्रावरील पोलिसांनी त्या मुलांकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. पोलिसांनी त्यांना थांबविल्यावर मुले आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलीस निरीक्षकाने मारहाण केल्याचा दावा मुलांनी केला. मुलांना अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याबाबत गोडसे आणि अन्य पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. पोलीस आणि उमेदवार गोडसे, आमदार सीमा हिरे, शिंदे गटाचे अन्य पदाधिकारी यांनी पोलिसांना जाब विचारत धारेवर धरले. बराच वेळ हा गोंधळ सुरू राहिला. पोलीस आपल्या कारवाईवर ठाम राहिले. मधल्या काळात केंद्रातील कर्मचाऱ्यांना हवालदारांनी स्वत: आत जावून डबे देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी उमेदवारांकडून होणारे आरोप फेटाळले. मुलांना समज देत सोडून देण्यात आले.