नाशिक : सिडकोत सोमवारी महायुतीच्या प्रचार फेरीदरम्यान महाविकास आघाडीशी वाद उदभवला. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे विरोधात तक्रारीनंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तम नगर येथील संपर्क कार्याजवळून महायुतीची फेरी जात असता मविआ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन शंभर खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या.
त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट मविआ संपर्क कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उघडे यांच्या हातातील मशाल खाली पडल्याने वातावरण चांगलेच तापले. हा प्रकार ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हेही वाचा…नाशिकमध्ये पावसाने ५१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल चार तासानंतर शहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहाणेवर याआधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून नोटीस बजावण्यात आली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.