मनमाड: येथून जवळच असलेल्या पानेवाडीस्थित भारत पेट्रोलियम कंपनीच्या (बीपीसीएल) इंधन प्रकल्पात व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवारी सकाळी टँकर चालकांनी प्रवेशद्वार बंद आंदोलन केल्यामुळे राज्याच्या विविध भागात होणारी इंधन वाहतूक ठप्प झाली. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने चर्चा करून टँकर चालकांच्या मागण्यांवर दोन दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. नंतर आंदोलन मागे घेऊन इंधन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बीपीसीएल अधिकारी क्षुल्लक कारणांवरून टँकरचालक, सहचालक आणि मालकांना वेठीस धरतात, अशी तक्रार करीत अधिकार्यांच्या मनमानी विरोधात टँकर चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. बहुतांश चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. रात्री अकरा नंतर वाहन तळात टँकर उभे करण्याची परवानगी द्यावी, सायंकाळी सहापर्यंत गाड्या भराव्यात, रिक्त होऊन आलेल्या टँकरची रात्री नोंद करावी, या वाहन चालकांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सकाळी पानेवाडी परिसरातील भारत पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतुकदार टँकर चालकांनी प्रवेशद्वार बंद आंदोलन केले.
या आंदोलनामुळे इंधन वाहतूक ठप्प झाली. वाहतुकदारांनीच संप पुकारल्यामुळे बीपीसीएल अधिकार्यांनी तातडीने बाहेर येऊन प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टँकर चालकांशी चर्चा केली. या प्रश्नांबाबत दोन दिवसांत सर्व संबंधितांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.