नाशिक : दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ, कुंभमेळय़ाच्या तारखा गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे जाहीर करण्यात आल्या. २०२६-२७ या वर्षी कुंभमेळा होणार असून यासाठी करण्यात येणाऱ्या विकासकामांचा नारळ गुरुवारी कुशावर्त परिसरात वाढविण्यात आला. प्रशासनासह साधू, महंतांना नियोजन सोपे व्हावे यासाठी या तारखा जाहीर करण्यात आल्याचे महंतांनी सांगितले. दुसरीकडे, नाशिक येथे वैष्णव पंथाकडून जाहीर करण्यात आलेल्या तारखा आमच्याशी काही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले. कुंभमेळय़ापूर्वीच आखाडा परिषदेतील अंतर्गत वाद सुरू झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
गुरूवारी महामंत्री हरीगिरी महाराजांकडून त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या तारखा जाहीर झाल्या. कुंभमेळय़ास साथ घालणारा शंख वाजवत ब्रह्मवृंदाच्या जयघोषात कुशावर्त कुंडात विधिवत पूजन करत शंखनाद करण्यात आला. कुंभमेळय़ास अद्याप पाच वर्षांचा कालावधी बाकी आहे. सिंहस्थ ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून प्रथम शाही स्नान दोन ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे.
द्वितीय शाही स्नान ३१ ऑगस्ट, तृतीय शाही स्नान १२ सप्टेंबर आणि सिंहस्थ समारोप २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने तिथी, ज्योतिष शास्त्रानुसार या तारखा काढण्यात आल्या. श्री पंचदशनाम जुना आखाडय़ाचे राज्य अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, साध्वी शैलाजामाता, त्र्यंबक आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती,महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
आज गुरुपुष्याच्या मुहूर्तावर सिंहस्थाच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने, भाविकांच्या सोयीसाठी सर्वानी कार्यरत राहिले पाहिजे, असे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी नमूद केले. दरम्यान, या तारखांशी वैष्णवपंथी आखाडय़ाचा संबंध नसल्याचे भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले. नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळय़ास साधू, महंतांसह देश -विदेशातील पर्यटक येतात. मागील कुंभमेळय़ास झालेली गर्दी, साधू, महंतामध्ये झालेले वाद, महिला साध्वींनी केलेली स्वतंत्र आखाडय़ाची मागणी यासह प्रशासकीय नियोजनातील त्रुटी टाळत पुढील नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान राहणार आहे.
वैष्णवपंथीयांचा संबंध नाही
आखाडा परिषदेचे दोन भाग झाले आहेत. रवींद्र गिरी आणि रवींद्र पुरी हे आखाडय़ाचे दोन अध्यक्ष आहेत. तसेच दोन महामंत्री आहेत. त्र्यंबक येथील १० आखाडे शैव पंथातील आहेत. नाशिक येथील आखाडे वैष्णव पंथाचे आहेत. नाशिक येथील तीनही आखाडय़ांचा या तारखांशी संबंध नाही. या संदर्भात कुठलीच बैठक झालेली नाही. याबाबत आखाडा परिषदेचे आमचे अध्यक्ष, महामंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच तारखा जाहीर केल्या जातील.
– भक्ती चरणदास महाराज (निर्मोही आखाडा)