लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थकीत कर्ज वसुलीसाठी शेतकरी सभासदांची शेतजमीन जप्ती, लिलावाद्वारे विक्री व संबंधितांची जमीन बँकेच्या नावे वर्ग करण्याची कारवाई करीत आहे. या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असून आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे गुरूवारी दुपारी एक वाजता ओझर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील निर्मल लॉन्स येथे ही बैठक होणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील-बहाळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अर्जुनतात्या बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल. शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर यावेळी मंथन होणार आहे. नैसर्गिक संकटात उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले. बाजारात येणाऱ्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. लाल कांद्याला जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कृषिमालाची भरपाई आदींवर चर्चा करण्यात येणार आहे.
आणखी वाचा- निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी बाजार समितीचे चार कर्मचारी निलंबित
जिल्हा बँकेच्या कारवाईला शेतकरी संघटनेने आधीच विरोध केलेला आहे. थकबाकीदारांच्या शेतजमिनी जप्ती, त्यांची लिलावाद्वारे विक्री अथवा त्या जमिनी नावावर करण्याची कारवाई केली जात आहे. या घटनाक्रमात शासनाची भूमिका धरसोडीची असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यावर विचार विनिमय करून आंदोलनाची पुढील रुपरेषा बैठकीत निश्चित होईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. बैठकीस जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास पवार, जिल्हाध्यक्ष बोराडे, संतु पाटील झांबरे यांनी केले आहे.
बँक सभासत्वासाठी दीड हजार अर्ज
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६८ वर्षाची परंपरा असून कधीकाळी तिची गणना राज्यातील नावाजलेल्या बँकांमध्ये केली जात होती. आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकेकडून धडपड केली जात आहे. अलीकडेच बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय वार्षिक सर्व साधारण सभेत घेतला गेला होता. त्यानुसार बँकेने वैयक्तिक सभासद नोंदणी सुरु केलेली असून अवघ्या पाच दिवसात दीड हजार सभासदांनी बँकेकडे सभासद होण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. आगामी मासिक सभेत संबंधितांना वैयक्तिक सभासद करून घेण्यात येईल. बँकेच्या वैयक्तिक सभासदांना महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. बँकेच्या निवडणुकीत उभे राहणे, मतदानाचा अधिकार तसेच इतर सभासदांना जे अधिकार लागू आहेत ते वैयक्तिक सभादानाही लागू असतील. भविष्यात परत अशी संधी येणार नाही. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी बँकेचे वैयक्तिक सभासद होण्यासाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेने केले आहे.