नाशिक : भाजपने शहरातील दोन्ही जागांवर विद्यमान आमदारांना संधी दिल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करुन मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. नाशिक पूर्वमध्ये पक्ष नेतृत्वाने दिलेले् आश्वासन पाळले नाही, अशी तक्रार करीत त्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी म्हटले आहे. बंडखोरांमुळे मतांची फाटाफूट रोखण्यासाठी भाजपची यंत्रणा सक्रिय झाली आहे. नाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन समजूत काढण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनी पुढाकार घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जिल्ह्यातील चार मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. शहरातील प्रत्येक मतदारसंघात १० ते १५ प्रबळ इच्छुक असल्याने तिकीट न मिळाल्याने त्यांच्यातील अस्वस्थता बाहेर पडत आहे. या घडामोडीत नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर होणे अद्याप बाकी आहे. सलग दोनवेळा निवडून आलेल्या आमदार देवयानी फरांदेंना पुन्हा तिकीट मिळण्याची खात्री होती. मात्र पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्यामुळे त्यांच्या गोटात अस्वस्थता आहे. दुसरीकडे, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघात ज्यांना तिकीट मिळाले, त्यांच्यासमोर बंडखोरांना रोखण्याचे आव्हान आहे. नाशिक पश्चिममध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. संबंधितांनी एकत्र येत सीमा हिरे यांच्यावर आगपाखड केली. इच्छुकांमधून एक सर्वमान्य उमेदवार उभा करण्याचे नियोजन केले जात आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी चार वाजता त्यांनी शिवाजीनगर येथील एल. डी. पाटील. शाळेच्या मैदानावर मेळाव्याचे आयोजन केले आहे.

हेही वाचा…बिबट्याच्या मृत्यूमागे घातपात, वन अधिकाऱ्यांचा संशय

नाशिक पूर्वमधून माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी स्थायी सभापती गणेश गिते हे उमेदवारीच्या स्पर्धेतून डावलले गेले. गिते यांनी राष्ट्रवादीकडून (शरद पवार) तिकीट मिळविण्याची तयारी केली आहे. माजी आमदार सानप यांनी पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्याचा मनसुबा ठेवला आहे. मधल्या काळात आपण पक्षापासून दूर होतो, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तिकीट दिले जाईल, असे आश्वासन देत भाजपमध्ये बोलावले होते. असे असताना राहुल ढिकले यांना तिकीट कसे मिळाले, याबाबत आश्चर्य आहे. या संदर्भात फडणवीस यांची एक-दोन दिवसात भेट घेतली जाईल. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित होईल, असे सानप यांनी सांगितले.

हेही वाचा…लोकसभेतील पराभूत उमेदवार विधानसभेत उमेदवारीपासून दूर

सीमा हिरे नाराजांना समजविणार

नाशिक पश्चिम मतदारसंघातील नाराज इच्छुकांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे आमदार सीमा हिरे यांनी ठरविले आहे. संबंधितांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सक्रिय केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तिकीट जाहीर झाल्यानंतर पक्षीय पातळीवर मंडलनिहाय सोमवार व मंगळवार बैठका सुरू झाल्या आहेत. यात प्रचाराची रुपरेषा निश्चित केली जाईल. नाशिकमधील एकाही मतदारसंघात कोणी बंडखोरी करणार नसल्याचा विश्वास भाजपचे सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी व्यक्त केला. तिकीट जाहीर झाल्यानंतर नाराजांकडून आपली भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. परंतु, सर्व इच्छुक हे पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी जपणार असल्याचे त्यांनी नमूद केले.