जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना २०२१ मध्ये आपल्या शैक्षणिक संस्थेच्या नावे सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाने चौकशीचे आदेश काढल्याने देवकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर देवकर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेशासंदर्भातही चाचपणी करुन पाहिली. परंतु, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रवेशास विरोध झाला. त्यामुळे सध्यातरी शरद पवार गटातच असलेले माजी मंत्री देवकर हे २०२१-२२ मध्ये जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे याच काळात ते त्यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचेही अध्यक्ष होते. बँक नियमन कायदा १९४९ चे कलम २० प्रमाणे ते संचालक अथवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही संस्थेस कर्ज मंजूर करण्यास प्रतिबंध असताना, त्यांनी पदाचा दुरूपयोग केला. आपल्या शैक्षणिक संस्थेच्या नावे तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून घेतले. देवकर यांनी पदाचा गैरवापर करत कर्ज घेतल्यानंतर ते पुढे जाऊन थकवल्याने जिल्हा बँकेच्या सभासदांचा विश्वासघात झाल्याची तक्रार झुरखेडा (ता.धरणगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक एस. जी. पाटील यांनी सहकार विभागाकडे केली. त्यानुसार, नाशिक येथील सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांना सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेवर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, देवकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून नियमानुसार कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करत असल्याने कोणत्याही चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थेसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेताना कोणताही नियमभंग केलेला नाही. याशिवाय कर्जाची परतफेड नियमितपणे केली जात असून, चौकशीतून खरी काय ती परिस्थिती समोर येईल. – गुलाबराव देवकर (माजी मंत्री, राष्ट्रवादी-शरद पवार)