लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेलेला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (५७) यास शासनाने निलंबित केले आहे. खरे सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या मालमत्तेचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. खरे कुटुंबियांची वेगवेगळ्या बँकांमध्ये २० हून अधिक खाती आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या खात्यांमध्ये ४३ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सहकार विभागात खरेची कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. सहकारी बँकांवर प्रशासक नेमण्यापासून ते बाजार समितीच्या निवडणुकीपर्यंत त्याने विविध माध्यमातून माया जमविल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील एका बाजार समितीच्या निवडणुकीत त्याने तसाच लाचखोरीचा प्रयत्न केला होता. तक्रारदार हे एका बाजार समितीच्या निवडणुकीत अलीकडेच निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात सहकार विभागाकडे एक प्रकरण दाखल आहे. त्यावर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी खरे आणि मध्यस्ती वकील शैलेश सभद्रा (३२) यांनी ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम निवासस्थानी स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले.
हेही वाचा… जळगाव तालुक्यात शेतकर्यावर बिबट्याचा हल्ला; गाईचाही पाडला फडशा
खरेविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासात खरेच्या घरातून सुमारे १६ लाखाची रोकड, ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे दागिने, दोन अलिशान मोटार, उच्चभ्रु वसाहतीत सदनिका, मालमत्तेची कागदपत्रे तसेच अनेक बँक खात्यांची पुस्तके सापडली. न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा… त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उभारणीत प्रादेशिक एकात्मतेचे दर्शन
या घटनाक्रमाची दखल घेत शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमान्वये खरे यास १६ मेपासून निलंबित केले. निलंबन काळात खरेचे मुख्यालय विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक विभाग राहणार आहे. शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय त्यास मुख्यालय सोडता येणार नसल्याचे बजावण्यात आले. निलंबन काळात खरे यास वैयक्तिक उद्योगधंदे तसेच अन्य नोकरी करण्यास प्रतिबंध केला आहे.
बँक खात्यांमुळे तपास यंत्रणा चकीत
सहकार विभागात विविध पदांवर कार्यरत राहिलेल्या सतीश खरेने बरीच माया जमविल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. खरे कुटुंबियांची २० हून अधिक बँकांमध्ये खाती आहेत. यात स्वत:सह पत्नी, मुलगा आणि मुलीच्या नावे असणाऱ्या खात्यांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचाही समावेश आहे. बँक खात्यांमध्ये ४३ लाखाची रक्कम आढळली. एखाद्या व्यक्तीच्या नावे एक, दोन बँक खाते समजण्यासारखे आहे. मात्र खरे कुटुंबियांच्या प्रत्येक व्यक्तीची सरासरी चार ते पाचहून अधिक खाती आहेत. त्यांच्या आणखी काही बँक खात्यांचे धागेदोरे हाती लागले. एखाद्या व्यक्तीच्या इतक्या बँक खात्यांमुळे तपास यंत्रणाही चकीत झाली आहे. काही बँकांमध्ये त्यांच्या सुरक्षा पेट्या (लाॅकर) असून त्यांच्या तपासणीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.