जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीशी संघर्ष करण्याची तयारी असल्यास बरेच काही करता येणे शक्य होते, याचा धडा जिल्हा खो-खो संघटनेने घालून दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुमारे ५० हजार रूपये खर्च करून संघटनेने तयार केलेल्या खो-खो मैदानाची मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने वाताहात झाली. संपूर्ण स्टेडियममध्ये आठवडय़ापेक्षा अधिक दिवस पाणी साचल्याने संघटनेने मैदानावर केलेला खर्च अक्षरश: पाण्यात गेला. या संकटामुळे खचून न जाता संघटनेने महिन्यापेक्षा कमी कालावधीत पुन्हा एकदा खो-खो मैदान उभे केले असून यावेळी ते पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि सुविधायुक्त होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठमोळ्या खो-खो च्या संवर्धनासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न होत नसताना आणि त्यातच राज्य संघटनेकडूनही होणारे प्रयत्नही तोकडे असताना जिल्हा संघटना मात्र सातत्याने प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे राज्य संघटनेवर कार्याध्यक्ष असलेले जिल्हा संघटनेचे पदाधिकारी मंदार देशमुख यांची यात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांकडून साथ मिळाल्याने छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उजव्या बाजुला खो-खो चे मैदान करण्यात आले. या मैदानासाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा संघटनेने केला. या मैदानावर अनेक जिल्हास्तरीय स्पर्धाही झाल्या. मैदानाची विवंचना मिटली, या आनंदात संघटनेचे पदाधिकारी असताना मागील महिन्यात नाशिकमध्ये पाऊस धो-धो बरसला आणि त्याचा फटका खो-खो च्या मैदानाला बसला. पावसाच्या पाण्याने स्टेडियमचे रूपांतर तलावात झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे स्टेडियममधील पाणी बाहेर काढण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने काही दिवस पाणी कायम राहिले. पाणी कमी झाल्यानंतर खो-खो संघटनेचे पदाधिकारी मैदानाकडे फिरकले असता झालेली अवस्था पाहून ते निराश झाले. मैदानाची सर्व माती इतरत्र वाहून गेली होती.

निराशा झटकत जिल्हा संघटनेने नव्याने भरारी घेत मैदानाचे काम सुरू केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून बिकट आर्थिक परिस्थितीमुळे फारशी काही मदत मिळणार नसल्याचे लक्षात आले. परंतु, कार्यालयाने संघटनेस मैदानाचे काम करण्यास परवानगी दिली हेही नसे थोडके असे म्हणत जोमाने कामास सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम जमीन सपाटीकरण करून माती उकरण्यात आली. त्यानंतर मुरूम, त्यावर बारीक मुरूम आणि नंतर माती असे काम करण्यात आले. बघता बघता खो-खो चे दोन मैदान तयार झाले. मैदानातील खेळाडुंना इतर कोणाचाही उपद्रव होऊ नये यासाठी व्दारही करण्यात आले. मैदानात कचरा जमा करण्याचीही व्यवस्था करण्यात आली. अंधारातही सराव सुरू राहावा यासाठी सहा अद्ययावत दिवे लावण्यात येणार आहेत. मैदानाशेजारील स्टेडियमच्या भिंतीला रंगरंगोटी करण्यात आली. या भिंतीवर खेळाशी संबंधित चित्रे काढण्याची संघटनेची योजना आहे. मैदानातच एका बाजुला मंच तयार करण्यात आला असून एखाद्या अद्ययावत क्रीडा केंद्रात ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व करण्याची संघटनेची तयारी आहे.

विशेषत्वाने खेळाडुंच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत असून विभागीय क्रीडा संकुलात खेळाडू आणि प्रशिक्षकांना बाहेरील गुंडांकडून जो त्रास सहन करावा लागतो, तसा प्रकार येथे होऊ नये म्हणून आधीपासूनच संघटनेकडून तयारी करण्यात येत आहे. मैदानाभोवती चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी मंदार देशमुख यांनी दिली आहे. मैदान तयार करण्यापासून आतापर्यंतच्या सर्व सुविधा देण्यापर्यंत पावणेदोन लाख रूपयांचा खर्च झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. नवे रूप ल्यालेल्या या मैदानावर ११ व १२ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनेतर्फे संघ निवडीसाठी स्पर्धा होणार आहे. मैदान उभे करण्याची ही कहाणी खेळाप्रती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची असलेली तळमळ दर्शविते.