शहरातील वळण रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर १५ अपघातप्रवण क्षेत्र आहे. तेथील अपघात रोखण्यासाठी दिवाळीपूर्वी गतिरोधक उभारून दिशादर्शक फलक लावले जातील. संबंधित भागात अतिक्रमण असल्यास तेही हटविले जाईल. तातडीने या उपाय योजना करून दीर्घकालीन उपायांवर काम हाती घेण्यात येणार आहे.
हेही वाचा- बांधकाम कामगारांचा उपायुक्त कार्यालयावर मोर्चा; गुरुवारी कल्याणकारी मंडळाबरोबर बैठक
पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावरील खासगी बसच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) शोधून त्यावर तातडीने उपाय करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली.
कैलासनगर चौफुलीवर अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. आंदोलने होऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. आधीच गतिरोधक बसविले असते तर १२ जणांना प्राण गमाविण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत स्थानिकांनी यंत्रणेवर आपला संताप व्यक्त केला होता. अपघातानंतर परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती. जखमींची भेट घेतल्यानंतर त्यांनी अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागांनी अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाय योजनांना करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी अपघातप्रवण क्षेत्र, रस्ते सुरक्षितता या विषयाचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पोलीस, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन, महानगरपालिका आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
बस अपघाताने कुंभमेळ्यात निर्मिलेल्या वळण रस्त्यांनी चौफुल्यांवर निर्माण झालेल्या समस्या समोर आल्या आहेत. शहरात १५ अपघातप्रवण क्षेत्र आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणाने वाहतुकीला अडथळे येतात. काही ठिकाणी पथदीपांचा प्रश्न आहे. दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारक संभ्रमात पडतात. अनेक ठिकाणी गतिरोधकांची निकड आहे. रस्ता सुरक्षा समितीची लगेच बैठक होऊन प्रलंबित उपाय तातडीने दिवाळीआधीच केले जातील, असे पालकमंत्री भुसे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. जिथे गतिरोधकांची आवश्यकता आहे, तिथे गतिरोधकांची उभारणी केली जाईल. अपघातप्रवण क्षेत्रात दिशादर्शक फलक लावले जातील. यासारखे तातडीने उपाय लगेच केले जातील. दीर्घकालीन उपायांवर काम सुरू केले जाईल, असे निश्चित झाल्याचे भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा- विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
रस्ता सुरक्षा समिती बैठकीविना
पंचवटी विभागात आरटीओ सिग्नल ते तारवालानगर चौफुली, मोरे मळा चौफुली आणि कैलासनगर (मिरची ढाबा) सिग्नल या अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविण्यास मंजुरी देण्याची मागणी महानगरपालिकेने जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीकडे केली होती. या समितीकडून तीन-चार वर्षात त्यास मान्यता मिळाली नाही. या बाबत प्रशासनाला वारंवार स्मरणपत्र पाठविले गेले. मात्र निर्णय न झाल्यामुळे गतिरोधकाचा विषय प्रलंबित राहिल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची बैठक झालेली नव्हती. परिणामी, अपघातप्रवण क्षेत्रात करावयाचे उपाय रखडले होते. गतिरोधक व तत्सम बाबींना या समितीची मान्यता बंधनकारक असते. बैठक झाली नसल्याने महापालिकेला कुठल्याही उपाययोजना करता आल्या नसल्याची बाब पालकमंत्र्यांसमोर मांडली गेल्याचे कळते. त्यामुळे या बैठकीनंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन हे विषय मार्गी लावले.
आरटीओच्या निष्क्रियतेवर ताशेरे
राज्य, राष्ट्रीय महामार्गासह वळण रस्त्यांवर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. नियमांचे पालन न करणाऱे अवजड वाहने, खासगी प्रवासी बसवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कुठलीही कारवाई होत नाही. अनेक रस्त्यांवर धोकादायक पध्दतीने वाहतूक होत असताना हा विभाग निष्क्रिय राहिल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला. आरटीओच्या अधिकाऱ्याने वाहनधारकांवरील कारवाईचे लक्ष्य पूर्ण झाल्याचे सांगून बचावाचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाल्याचे त्यांनी नमूद केले. पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरक्षित वाहतुकीसाठी काय केले, असा प्रश्न करीत आरटीओला कानपिचक्या दिल्या
अतिक्रमणांवर हातोडा
औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुलीवरील अपघातानंतर महानगरपालिकेने या परिसरातील राजकीय नेत्याच्या हॉटेलसह वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा चालविला. हॉटेल मिरचीसमोरील तसेच अमृतधाम, नांदुरनाका परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली गेली. कैलासनगर चौफुलीवरील अतिक्रमणांमुळे वाहनांना प्रत्यक्ष चौकात येईपर्यंत अंदाज येत नाही. महामार्ग व वळण रस्त्यावरील लहान, मोठ्या टपऱ्या, हॉटेलचे अनधिकृत शेड व तत्सम अतिक्रमणे हटविली गेल्याची माहिती उपायक्त करूणा डहाळे यांनी दिली.