नंदुरबार : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संशोधन विभाग असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने येथील श्रॉफ हायस्कूलच्या समिधा देवरे या विद्यार्थिनीच्या ‘ दिव्यांगस्नेही रॅम्प ‘ या तांत्रिक संशोधनाला शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. संपूर्ण देशातून निवड झालेल्या २०० संशोधकांमध्ये नंदुरबार जिल्ह्याला हा गौरव मिळाला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संशोधन विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या विविध तंत्रज्ञानयुक्त संकल्पनांना मूर्त रूपात चालना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘ स्कूल इनोव्हेशन काॅन्टेस्ट ‘ घेण्यात येत असते. हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नवकल्पनांचे संशोधन सादर करतात. या स्पर्धेतील उपयुक्त व उत्कृष्ट संशोधनाचे उद्यम निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्याच्या संशोधनाचा पुढील टप्प्याचा विकास होणे आवश्यक असते. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

यावर्षी संपूर्ण भारतातून १८ हजार ५९२ शाळांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. ५२३२ स्पर्धक संपूर्ण भारतातून नोंदणीकृत झाले होते. यातून १४५० स्पर्धकांना संशोधन सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले होते. सादरीकरणासाठी गेलेल्या या स्पर्धकांमधून केवळ २०० संशोधक विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनाचा विकास ( प्रोटोटाइप डेव्हलपमेंट ) करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी समिधा नितीन देवरे हिचा समावेश आहे. आदिवासी मागास जिल्हा क्षेत्र म्हणून नोंद असलेल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी हा बहुमानाचा भाग आहे.

अपंगांना रेल्वे डब्यात चढ- उतर करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रेल्वे डबा आणि फलाट यामध्ये मोठी फट असते. त्यामुळे अपंग व्यक्ती डब्यात सहजपणे प्रवेश करू शकत नाहीत. यासाठी मदतनीस उचलून त्यांना डब्यात घेऊन जातो. त्यानंतर व्हीलचेअर दिली जाते. एकंदरीतच व्हिलचेअरसह अपंगांना रेल्वे डब्यात प्रवेश करणे कठीण जाते.

अपंग व्यक्तींचे चढणे-उतरणे सोयीचे व्हावे, म्हणून फलाटापासून बोगीपर्यंत स्वयंचलित असे ‘व्हिलचेअर रॅम्प ‘ समिधाने तयार केले आहे. तिच्या या संशोधनाचा पुढील टप्प्यावर विकास होण्यासाठी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती शाळेकडे पाठवली आहे. एआयसीटीइच्या संशोधन विभागातील उपसंचालक डाॅ. इलांगोवन करीअप्पन यांनी शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा शाह यांच्याकडे शिष्यवृत्ती सुपूर्द केल्याचे पत्र पाठविले आहे.

समिधा देवरेचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, सर्व पदाधिकारी, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. तिला मार्गदर्शक म्हणून प्रा. नितीन देवरे यांनी मदत केली.