नाशिक: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड येथील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर दिवाळीच्या सुट्टीमुळे होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन २७ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे श्री भगवती दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. श्री भगवती मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवल्यास भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा आणि इतर बाबींवर पडणारा ताण विभागला जाईल. भाविकांनाही आपल्या सोईनुसार श्री भगवतीचे दर्शन घेता येऊ शकेल, हे विचारात घेऊन मंदिर २७ ऑक्टोबरपासून २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीक्युलर रोप वे सुविधा देखील भाविकांसाठी सुरू ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी गर्दी न करता मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : मतदारांशी संपर्क साधण्यासाठी फराळ, आकाशकंदील, पणत्यांचा वापर
सप्तशृंग गडावरील देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी गुरुवारपासून १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने दर्शनासाठी मुंबई, पुणे, गुजरात, मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून भाविक येत आहेत. या कालावधीत भाविकांना योग्य पध्दतीने दर्शन व्हावे, भाविकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त संस्थेने २४ तास मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. – ॲड. दीपक पाटोदकर (विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तश्रृंग गड)