तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून गणले जाणारे लक्ष्मीपूजन बुधवारी आाहे. त्यासाठी बाजारपेठांमध्ये अधिक उत्साह पाहावयास मिळत आहे. सर्वत्र केरसुणी, पणत्या, फूलविक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने नागरिकांना मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार परिसरात चालता येणेही अवघड झाले आहे. सकाळी फुलांचे वधारलेले दर आवक वाढल्यानंतर कमी झाले. एकंदरीत लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.
लक्ष्मीपूजन म्हणजे यंदा दिवाळीचा चवथा दिवस. दिवाळी उत्सव सुरू झाल्यापासून गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठेची अवस्था मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यात अधिक वाढ झाली. लक्ष्मीपूजनासाठी खरेदीला उधाण आल्याचे चित्र आहे. या दिवसाचे महत्त्व व्यापारी, व्यावसायिकांसाठी अधिक असते. या दिवशी खतावण्या, चोपडय़ांसह धनाची पूजा करतांना त्यांच्यामार्फत आपली दुकाने, कार्यालये फुलांनी सुशोभित करण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो.
या दिवशी फुलांना असणारी लक्षणीय मागणी लक्षात घेऊन शेतकरी वर्गाने त्यांची लागवड करण्याची तजवीज दीड ते दोन महिन्यांपूर्वी केली होती. मंगळवारी सकाळपासून ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागली. सकाळी झेंडूच्या फुलांचे दर ६० ते ७० रुपये प्रति शेकडा इतके असले तरी जशी आवक वाढली तसे ते ४० ते ५० रुपयांपर्यंत खाली उतरले.
दर कमी न करण्याचा फटका दसऱ्यावेळी शेतकऱ्यांना बसला होता. अनेकांना विक्रीविना पडलेले फुलांचे ढीग सोडून तसेच घरी परतावे लागले होते. हा अनुभव गाठीशी असल्याने विक्रेत्यांनी तडजोडीचे धोरण स्वीकारून माल विक्रीवर लक्ष दिले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरात केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते. त्यामुळे फुलांबरोबर केरसुणी खरेदी केली जात आहे.
सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागात मात्र तसा उत्साह पाहावयास मिळत नाही. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठांवर झाला आहे. अशा स्थितीतही काहींनी उधारउसनवार करून दिवाळी खरेदी करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
बलिप्रतिपदेला भव्य बळी नांगराचे पूजन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता बलिप्रतिपदेनिमित्त बळिराजा अभिवादन कार्यक्रम सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील यांनी दिली. कार्यक्रमात शेतकऱ्यांना उपयोगी अशी विळी, खुरपे, पास, घमेले, टिकाव, फावडे, कुदळ आदी अवजारांची पूजा केली जाणार आहे. पूजनासाठी शेतकऱ्यांचे प्रमुख अवजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३० फूट उंचीच्या बळी नांगराची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर विविध सामाजिक संघटनाच्या वतीने बळीराजाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
पोलिसांची नजर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात फक्त रात्री आठ ते १० या कालावधीत फटाके वाजविण्यास परवानगी आहे. तसेच अधिक आवाजाचे फटाके उडविण्याच्या विक्रीवर र्निबध आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास आठ दिवसांपर्यंत कारावासाची शिक्षा अथवा १२५० रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होतील, असा इशारा आधीच दिला गेला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्वाधिक फटाके वाजविले जातात. या काळात न्यायालयाचे निर्देश आणि ध्वनिप्रदूषणाची निगडित नियम यांचे उल्लंघन होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. फटाके फोडण्यास दोन तासांचा अवधी दिला गेला असला तरी फटाक्यांचे आवाज इतर वेळी घुमत असतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यात वाढ होऊ शकते. यामुळे नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर यंत्रणेला नजर ठेवावी लागणार आहे.