सोमवारी धनत्रयोदशीनिमित्त दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठ गाठल्याने काही दिवसांपासून गजबजलेली बाजारपेठ सोमवारी गर्दीने अधिकच फुलली. धनत्रयोदशीनिमित्त अनेकांनी धन-धान्याची पूजा केली. आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने वैद्य मंडळी धन्वंतरीचे पूजन करतात. सोमवारी शहर परिसरात ठिकठिकाणी धन्वंतरी प्रतिमा, चरक संहिता सुश्रुत संहिता, विविध आयुधांचे पूजन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्य विक्रांत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही यावेळी विविध वनस्पती आणि खलाचे पूजन केले. मंगळवारी नरकचतुर्दशीनिमित्त अभ्यंगस्नान होणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत सुवासिक तेल आणि उटण्याचा दरवळ पसरला आहे. दीपोत्सवाचा महत्त्वपूर्ण दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत जय्यत तयारी सुरू आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत सोने, वाहन खरेदीसह अन्य काही वस्तूंच्या खरेदीसाठी अनेकांची लगबग सुरू आहे. त्या दृष्टीने व्यावसायिकांकडे नोंदणी सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाचे महत्त्व व्यापारी व व्यावसायिकांसाठी अधिक असते. या दिवशी खतावण्या आणि चोपडय़ांसह धनाची पूजा करताना त्यांच्यामार्फत आपली दुकाने व कार्यालये फुलांनी सुशोभित करण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. सर्वसामान्य नागरिकदेखील फुलांची सजावट करण्यास मागे रहात नाही. एकूणच या दिवशी फुलांना असणारी लक्षणीय मागणी लक्षात घेऊन शेतकरी वर्गाकडून दोन दिवस आधीच बाजारपेठेत झेंडूसह शेवंती, निशिगंध, जलबेरा अशी विविध फुले आणण्यात आली आहे.  तेजाचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवास रविवारी उत्साहात सुरुवात झाली. रविवारी वसुबारसनंतर दीपोत्सवात रंग भरण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या लखलखाटाने शहर प्रकाशमय झाले आहे. बाजारपेठांमध्ये केरसुणी, पणत्या विक्रेत्यांचे साम्राज्य पसरले आहे. यंदा दिपोत्सव सहा दिवस रंगणार असल्याने बाल गोपाळांसह अनेकांनी दीपोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

फटाक्यांमुळे ध्वनी व हवेतील प्रदूषणाबाबत कितीही ओरड होत असली तरी खरेदीच्या उत्साहाला कोणताही ‘ब्रेक’ लागला नाही. शहरातील त्र्यंबकरोडवरील नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनच्या सर्वच स्टॉलवर फटाके खरेदीसाठी गर्दी होत आहे. फ्लॉवरपॉट, भूईचक्र, रॉकेट, लेस अशा पारंपरिक प्रकारांसोबत चीनी माल खरेदीकडेही अनेकांचा कल आहे. आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी प्रकारच्या फटाक्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. व्यापारी वर्गाचा कल माळा खरेदीकडे राहिल्याने एक हजारापासून ते १० हजारांपर्यंतच्या माळांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली.

महागाईची काहिशी ओरड असली तरी खरेदीवर त्याचा कोणताच परिणाम न झाल्याने व्यावसायिकांनी ही दिवाळी आनंदाची, सुख व समाधानाची जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्ष्मीपूजन, भाऊबीजेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठांमधील खरेदीचे वातावरण कायम राहील, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली.

लक्ष्मी पूजन मुहूर्त

बुधवारी सायंकाळी लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे पूजन करण्यात येईल. सकाळी साडेसहा ते आठ (लाभ),८ ते ९.३० (अमृत), ११ ते १२.३० (शुभ), दुपारी ३.३० ते ५ (चंचल), सायंकाळी ५ ते ६.३० (लाभ), ६.३० ते ८ (अमृत), ८ ते ९.३० (चंचल) मुहूर्त आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali celebration 2018