मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने भर दिवसा घरातून चोरटय़ाने लंपास केल्याची घटना येवला शहरातील बदापूर रस्त्यावर घडली. दिवाळीच्या काळात बंद घरे धुंडाळून चोरटे सक्रिय झाल्याचे या घटनेने दर्शविले आहे.

येवला येथील साई कॉलनी परिसरातील शाम श्रीश्रीमाळ यांचे त्याच परिसरात कपडय़ाचे दुकान आहे. मुलीचे लग्न असल्याने ऐनवेळी धावपळ नको म्हणून त्यांनी लग्नासाठी काही दागिने तयार करत घरात ठेवले. दिवाळीची धामधूम सुरू असल्याने ग्राहकांची कपडे खरेदीसाठी गर्दी असल्याने कुटुंबीय दुकानात मदत करण्यासाठी गेले होते. ही संधी साधत चोरटय़ाने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. शयनकक्षातील कपाट बनावट चावीने उघडले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच काही रोकड असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. कोणाला संशय नको म्हणून घरातून पोबारा करताना चोरटय़ाने मागील दरवाजाचा वापर केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणा माहीतगाराचे हे काम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Story img Loader