लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : कांदा उत्पादकांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील माळवाडी येथे मंगळवारी शेतकऱ्यांनी एकत्र येत “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..” सत्ताधारी-विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये, अशा आशयाचे फलक गावात लावले आहेत.
कांदा उत्पादक अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहे. कांदा शेती करण्यासाठी लागणारा खर्चही सध्या मिळणाऱ्या भावातून भरुन निघत नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव विकायला काढण्याचा ठराव केला होता. तेव्हा व्यथित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही आले नव्हते. त्यामुळे आता मत मागायला गावात येऊ नका, असा इशारा कांदा उत्पादकांनी सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. आता कोणाला मत द्यायचे ते आम्हीच ठरवू, असे अविनाश बागूल या शेतकऱ्याने सांगितले.
आणखी वाचा-त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
कांद्याचे दर थोडे वाढले की, केंद्र सरकारकडून दर कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जातात. निर्यात बंदी करुन कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले जात आहे. कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या धर- सोड धोरणांमुळे कांदा उत्पादक देशोधडीला लागले असल्याची व्यथा किशोर बागूल यांनी मांडली. शेतकरी अनेक दशकांपासून आर्थिक झळा सोसत आहेत. कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किंमतींमध्ये १० पट वाढ झाली आहे. त्या प्रमाणात कांदा दर कधीही मिळत नाही. उलट मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केले जाते. महागाई दुर्लक्षित केली जाते. कांदा विषय पुढे आणून राजकारण केले जाते, असे माळवाडीकरांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा- नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
शेतकऱ्यांकडे आमचे लक्ष आहे हे दाखविण्यासाठी पुढाऱ्यांनी कांद्याचे ट्रॅक्टर चालवणे, ढिगाऱ्यातून चांगले कांदे निवडणे, अशी नाटके करण्यापेक्षा पक्षादेश बाजूला ठेवून कांदा उत्पादकांना दर मिळवून देण्यासाठी भांडले पाहिजे. -अविनाश बागूल (शेतकरी, माळवाडी, देवळा)
कांदा प्रश्नावर अपयशी ठरलेले केंद्र सरकार आणि मूग गिळून गप्प असलेल्या विरोधी पक्षाच्या निषेधार्थ आम्ही प्रत्येक घरावर काळे झेंडे फडकवू. -विनोद आहेर (शेतकरी, सरस्वती वाडी, देवळा)