परदेशात घर घेऊन देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर जावयाने मुलीसह नातवंडांना अमेरिकेत डांबून ठेवल्याची तक्रार शहरातील एका महिलेने केली आहे. या प्रकरणी अमेरिकेतील जावयासह सासरच्या ठाणे आणि मुंबई येथील पाच जणांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>जळगाव : पांढर्या सोन्याच्या चोरीच्या घटनांमुळे बळीराजाला आर्थिक फटका
तक्रारदार महिलेच्या मुलीचा विवाह मुंबईतील घोडबंदर रस्ता भागात राहणाऱ्या डॉ. साईप्रसाद झेमसे यांच्याशी झाला आहे. संशयित जावयाने मुलीसह नातवंडांना अमेरिकेत नेले. सासरच्या मंडळींकडून जावयाला परदेशात घर घेऊन देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याने सासरच्या मंडळींच्या चिथावणीवरून जावयाने मुलीचा छळ सुरू केला. त्याने मुलीसह नातवंडांना विदेशात डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. मुलीचे स्त्रीधन काढून घेत संशयित जावयाकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असून तिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून अमेरिकेतील व्हर्जिनिया भागात वास्तव्यास असलेला संशयित पती डॉ. साईप्रसाद झेमसे याच्यासह मुंबई, ठाणे येथील सासरे मधुकर झेमसे, सासू माधुरी झेमसे, नंदोई अमोल पवार, नणंद सोनाली पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.