अनाथालयांच्या संचालकांचा संशय
कुमारवयीन प्रेमप्रकरणे, समाज माध्यमांवरील स्वैर भटकंती, भिन्नलिंगी व्यक्तीविषयी वाटणारे शारीरिक आकर्षण यासह अन्य काही कारणास्तव काही वर्षांत कुमारी मातांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत कुमारी मातांच्या मुलांना स्वीकारण्यास समाज अद्याप तयार नाही. यामुळे आजही वर्षांकाठी कुमारी मातांच्या त्यागपत्रातून अनाथाश्रमात अनेक मुले दाखल होतात. तथापि, कुमारी मातांचे प्रमाण आणि अनाथालयात येणाऱ्या बालकांची संख्या यामध्ये बरीच तफावत आहे. या घडामोडीत काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्यामुळे कुमारी मातांच्या बाळांची सर्रास विक्री होत असून त्यात डॉक्टरांची साखळी कार्यरत असल्याचा संशय अनाथालयांच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय आरोग्य विभाग दर १० वर्षांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवाल तयार करतो. नुकताच आरोग्य विभागाने हा अहवाल जाहीर केला. त्यात १५ ते १९ वयोगटातील मातांचे प्रमाण हे शहरात सहा टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के असे सरासरी ८.३ टक्के असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. १५ ते १९ हा कुमारगट असून यातील गर्भधारणेचे प्रमाण चिंताजनक आहे. कुमारी मातांचे प्रमाण वाढत असले तरी अनाथालयात येणाऱ्या बालकांच्या संख्येत मात्र वाढ होत नसल्याचे चित्र आहे. या मुद्दय़ावर अनाथालय संचालकांनी वेगवेगळी मते नोंदवली आहेत. नाशिक येथील आधाराश्रमातील बालगृहात वर्षभरात ४१ बालके दाखल झाली. त्यातील १४ मुले कुमारी मातांच्या त्यागपत्राने दाखल झाली. तसेच काही दिव्यांग असल्याने पालकांनी त्यागपत्र दिले. काहींनी दोन मुले व मुलीनंतर मुलगा किंवा मुलगी हवी म्हणून बाळ होऊ दिले. अपेक्षित बाळ नसल्यानेही अनेकांनी त्यांचा त्याग केल्याने ही संख्या वाढल्याचे समन्वयक राहुल जाधव यांनी सांगितले. डोंबिवली येथील जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकारी संचालक जयश्री देशपांडे यांनी कुमारी मातांचे प्रमाण वाढले असले तरी अनाथालयात येणाऱ्या बालकांची संख्या कमी झाल्याचे नमूद केले. मागील वर्षी शून्य ते सहा दिवसांची १५ ते १८ बालके दाखल झाली. ते घेण्यासाठी काही जोडपीही आश्रमात येऊन गेली. मात्र किचकट कायदेशीर प्रक्रिया पाहून त्यांनी बाहेरच अवैधरीत्या बालक मिळवले. त्यातच दत्तक विधानाची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने अडचणी येत आहेत. जोडपी बाहेरच्या बाहेरच कुमारी माता किंवा काही डॉक्टरांकडून बालक खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर येथील स्नेहांकुरच्या प्राजक्ता कुलकर्णी यांनी अनाथालयात येणाऱ्या बालकांचे प्रमाण ‘जैसे थे’ असल्याचे सांगितले. याबाबत जागरूकता होणे गरजेचे आहे. कुमारवयीन पिढीला प्रबोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. फेडरेशन ऑफ अ‍ॅडॉप्शन संस्थेचे अध्यक्ष सुनील अरोरा यांनीही कुमारी मातांचे प्रमाण वाढल्याचे मान्य करत त्यातून जन्माला येणारी बालके ही अनाथालयातच येतात असे नव्हे, हे आवर्जून नमूद केले. काही वेळा कुमारी माता एकल पालकत्व स्वीकारतात. काही वेळा कुमारी मातांची घरची परिस्थिती आणि तिची मानसिकता लक्षात घेता त्या नवजात शिशूची विक्रीही केली जाते. यामुळे अनाथालयात येणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader