आपणास आजार झाला असेल तर लपविण्यापेक्षा त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. करोनासारख्या आजाराशी लढताना डॉक्टरांवर विश्वास ठेवत त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे परिस्थितीत हाताबाहेर गेल्यास डॉक्टरांवर हल्ला करण्यापेक्षा आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्य़ातील तिसऱ्या करोनामुक्त २७ वर्षांच्या युवकाने केले आहे.

चांदवड टोलनाक्यावर काम करत असताना जनता संचारबंदीच्या दिवशी दुपारी चारपासून रात्री १२ पर्यंत मुंबई, पुणे, जळगाव अशा वेगवेगळ्या भागांतून चारचाकी वाहने चांदवडच्या दिशेने आली. खबरदारीचा उपाय म्हणून टोल व्यवस्थापनाने हातमोजे, मास्क, सॅनिटायझर दिले.  २३ तारखेला मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानुसार सकाळी नाश्त्याला कुटुंबातील सर्वाना याविषयी कल्पना दिली. घरात सहा महिन्यांच्या बाळासह एक आणि पाच वर्षांचे चिमुकले, वयोवृद्ध आईवडील आहेत. त्यांची काळजी म्हणून मी स्वत:लाच अलगीकरण करून घेतले. २५ तारखेपासून ताप जाणविण्यास सुरुवात झाली. खासगी दवाखान्यात काही दिवस उपचार करूनही बरे न वाटल्याने मालेगाव सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. हितेश महाले यांना त्रासाची पूर्वकल्पना दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही तपासण्या केल्या. तपासणीचा अहवाल घेऊन डॉ. महाले यांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात बोलावले. करोना संशयित असल्याची त्यांची खात्री झाल्यावर तातडीने घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. २४ तासांत माझा अहवाल  आला.

डॉ. महाले सकाळी नेहमीप्रमाणे तपासणीसाठी आले असता अतिशय शांततेत आणि प्रेमाने मला समजावून सांगितले. आजाराचे पथ्यपाणी, काय काळजी घ्यायची, हे लक्षात आले. डॉक्टरांनी तू सकारात्मक विचार कर, हे विचारच रोगप्रतिकारकशक्ती वाढवतील, हे सांगितले असल्याने सर्व काही विसरून डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली.  १८ दिवसांच्या प्रवासात कुठल्याही नातेवाईकांशी आणि मित्रांशी संपर्क झाला नाही. या काळात व्यायाम करत सकारात्मक विचार वाढतील, असेच काही समाजमाध्यमात शोधत वाचन केले. चित्रफिती पाहिल्या. करोनामुक्त होऊन घरी परतल्यावरही सहा महिन्यांचा चिमुकला आणि कुटुंबातील इतरांच्या आरोग्याची काळजी म्हणून पुढील १४ दिवस स्वत:ला वेगळे करून घेतले आहे.

नागरिकांना एवढेच सांगेन की, डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतत पालन करा. घरी राहा, सुरक्षित राहा. कोमट पाणी प्या. काढा प्या. पोटभर जेवा तसेच अंगात उष्णता वाढेल असे पदार्थ खा, असा सल्ला त्याने दिला.