नाशिक – पहाटेच्या सुमारास तहानलेल्या एका कुत्र्याने पाणी पिण्यासाठी हंड्यात तोंड घातले. आणि त्याची मान अडकली. काही केल्या ती हंड्यातून बाहेर निघेना. विचित्र स्थितीमुळे सैरभैर झालेल्या या मुक्या प्राण्याची अवस्था पाहून आसपासची कुत्री भुंकू लागली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत अग्निशमन दलाच्या पथकाने या कुत्र्यास मुख्यालयात आणले. कटरच्या सहाय्याने हंड्याचा पत्रा कापून अलगदपणे त्याची सुखरूप सुटका केली.
शहरातील टाकळी गावात हा प्रकार घडला. पहाटे साडेतीनच्या सुमारास अडकलेली कुत्र्याची मान साडेचार तासानंतर हंड्यातून मोकळी झाली. कुत्रा स्थिरस्थावर झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यास पाणी पाजून तृप्त केले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाळीव कुत्र्याने पाणी पिण्यासाठी हंड्यात डोके घातले. आणि विचित्र संकटाला त्याला सामोरे जावे लागले. अडकलेली मान निघेना.
कुत्र्याला काही दिसत नसल्याने तो सैरावैरा पळू लागला. आसपासच्या कुत्र्यांनी भुंकून नागरिकांना जागे केले. या घटनेची अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. दलाचे जवान काही मिनिटात दाखल झाले. हंड्यात मान अडकलेल्या कुत्र्याची अवस्था पाहून तेही हबकले. इतर कुत्रे भुंकत असल्याने तिथे मदतकार्य करणे शक्य नव्हते. त्यामुळे पथकाने तातडीने कुत्र्याला अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आणले. तिथे विशिष्ट पद्धतीच्या कटरने हंड्याचा पत्रा कापला गेला. हे करताना कुत्र्याला इजा होणार नाही, याची काळजी घेतली गेली.
अर्धा ते पाऊण तासानंतर कुत्र्याची सुखरूप सुटका करण्यात करण्यात आली. कुत्र्याचा जीव वाचल्यामुळे जल्लोष झाला. हंड्यातून मान मोकळी झाल्यानंतर कुत्र्याचे भावदेखील कृतज्ञतेचे होते. तहानलेल्या मुक्या प्राण्यास पाणी देण्यात आले. नतर त्याला पुन्हा टाकळी गावात मूळ निवासी भागात सोडण्यात आल्याची माहिती प्रभारी केंद्रप्रमुख के. टी. पाटील यांनी दिली.
पाटील यांच्यासह चालक देटके, सांत्रस, फायरमन सोमनाथ थोरात, व्ही. पी. शिंदे, दिनेश लासुरे, इसार शेख, गौरव पाटील, शिवम मोरे, प्रफुल्ल गायकवाड, अभिषेक बोराडे या जवानांनी अथक परिश्रम करून ही बचाव मोहीम पार पाडली.