लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राबाबत साशंकता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमिवर, निवडणूक आयोगाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी प्रात्यक्षिक सादर करून मतदान यंत्र सुरक्षित असल्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी नागरिक मतदानाचे प्रात्यक्षिक करून व्हीव्ही पॅटद्वारे त्याची नोंद योग्य प्रकारे झाली का, याची पडताळणी करू शकणार आहेत.
कुणाला यंत्राबाबत काही प्रश्न असल्यास त्यांचे निराकरण तज्ज्ञांमार्फत केले जाणार आहे. फिरत्या वाहनातून शहर व गावोगावी ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात दोन फिरती वाहने आणि एका कायमस्वरुपी केंद्रामार्फत ही जनजागृती केली जाईल. जिल्ह्यात या मोहिमेला १० डिसेंबरपासून सुरुवात होत असून २९ फेब्रुवारीपर्यंत ती सुरू राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
आणखी वाचा-नाशिक : वाढदिवसानिमित्त फटाके फोडून हुल्लडबाजी, चौघांना चोप
या माध्यमातून मतदान यंत्र किती सुरक्षित आहे, हे अधोरेखीत केले जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक यंत्रणेची तयारी सुरू आहे. निवडणुकीत एखादा पक्ष वा उमेदवाराचा पराभव झाल्यास मतदार यंत्राला जबाबदार धरले जाते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत निकालानंतर तसेच होत आहे. या पार्श्वभूमिवर, निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये जाऊन जनजागृतीचा मार्ग अवलंबला आहे. पुढील दोन महिने शहर व ग्रामीण भागात फिरत्या वाहनातून मतदार यंत्रांचे प्रा्त्यक्षिक सादर केले जाणार आहे. मतदारांना यंत्राबाबत काही शंका असल्यास त्यांचे निरसन केले जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात दोन फिरती वाहने दिली जाणार आहेत. तसेच या काळात एक कायमस्वरुपी केंद्र कार्यान्वित असेल. यंत्राबाबत तांत्रिक माहिती असलेला कर्मचारी असतील. राजकीय पक्ष व मतदार आपले प्रश्न उपस्थित करू शकतील.
आणखी वाचा-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६३ कोटींचा प्रस्ताव, अवकाळीची ३५ हजार हेक्टवरील पिकांना झळ
मतदानाद्वारे पडताळणीची संधी
आठवडे बाजार, बस स्थानक, रेल्वे स्थानक, महाविद्यालय, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय आणि वर्दळीच्या चौकात फिरते वाहन जनजागृती करणार आहे. यावेळी यंत्रांची संपूर्ण कार्यपध्दती मांडली जाणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रात्यक्षिक करता येईल. व्हीव्ही पॅटद्वारे योग्य प्रकारे नोंद झाली की नाही हे पडताळता येईल. मतदार यंत्र त्यांना हाताळता येईल, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.