नाशिक – कृषी विभागाच्यावतीने वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेवेळी एका परीक्षार्थीच्या पादत्राणात (सॅण्डल) भ्रमणध्वनीसह इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले. जालना येथील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यंतरी तलाठी भरती परीक्षेवेळी असाच काहिसा प्रकार उघड झाला होता. तेव्हा पेपर फुटल्याची चर्चा झाली होती. या पाठोपाठ आता कृषी विभागाच्या परीक्षेवेळी एकाकडे संशयास्पद साधने आढळली.
सूरज जारवाल (२३, जारवालवाडी, सागरवाडी, बदनापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने शुक्रवारी कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपीक या पदासाठी राज्यभरात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. शहरातील अनेक केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. म्हसरूळ येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला.
हेही वाचा – महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या बंडावेळी आमदारांना ५० कोटींचं प्रलोभन – अंबादास दानवे
ऑनलाईन परीक्षा असल्याने केंद्रावर सर्वच परीक्षार्थींची झडती घेण्यात आली. यावेळी संशयिताच्या पादत्राणाला चोरकप्पा असल्याचे दिसून आले. त्यात भ्रमणध्वनी तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरण होते. ही बाब पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्र प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिल्यावर याबाबत ऋषिकेश कांगणे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.