नाशिक – स्वातंत्र्योत्तर काळात देशाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असा दावा होत असला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. पाश्चात्यांच्या तुलनेत आपण मागे आहोत. जागतिक पातळीवर ठसा उमटवायचा असेल तर आपण कौशल्यपूर्ण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणविषयक वेगवेगळे पर्याय, सुविधा देतांना त्यांच्यात निकोप वृत्ती जोपासणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
येथील दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्र. पु. तथा बाबासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतीनिमित्त अक्षय्य पुरस्कार डॉ. काकोडकर यांना मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, महावस्त्र, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे आहे.
हेही वाचा >>>घंटागाडीविरोधात जळगाव जिल्ह्यात आंदोलन का?
यावेळी डॉ. काकोडकर यांनी, पाश्चात्य देशांचे राष्ट्रीय सकळ उत्पादन दर पाहिल्यास आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे निदर्शनास आणले. केवळ पैसा मिळाला म्हणून आनंद होतो, असे नाही. याबरोबर अनेक गोष्टी साध्य होणे आवश्यक आहेत. सरासरी जीवनमान वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एखादा देश हा तंत्रज्ञान, सामरिक सामर्थ्य, संशोधन यासह अन्य काही बाबींमुळे सामर्थ्यशाली बनतो. त्याअनुषंगाने भारतात चांगल्या दर्जाचे संशोधन होणे आवश्यक आहे. बालशिक्षण महत्वाचा मुद्दा आहे. शालेय शिक्षणात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचे डॉ. काकोडकर यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष वैशंपायन यांनी, शास्त्रज्ञांचे काम लोकांपर्यंत पोहचत नसल्याची खंत व्यक्त केली. शास्त्रज्ञांनी देशासाठी काय योगदान दिले, हे चित्रपट किंवा अन्य कोणी दाखवलेले नाही. डॉ. काकोडकर यांनी म्हटल्यानुसार एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा थांबायला हवी. आज अणुशक्ती वाढल्याने सगळे देश आपल्याकडे आदरयुक्त भीतीने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शैक्षणिक संस्था कधी बंद पडतील माहिती नाही. आमच्याकडे विज्ञान शिक्षक नाहीत. शासन शिक्षक देत नाही. पोर्टल किंवा अन्य काही अडचणी सांगितल्या जात असल्या तरी शैक्षणिक योजना बदलायला हव्यात. औद्योगिक संस्था शाळा दत्तक घेणार आहेत. त्या संस्थांनी संशोधन संस्था काढाव्यात, शास्त्रज्ञांनाही मदतीचे हात मिळतील, असे वैशंपायन यांनी नमूद केले. यावेळी काकोडकर यांच्या पत्नी सुयेशा काकोडकर तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.