शफी पठाण, लोकसत्ता
कुसुमाग्रज नगरी, नाशिक : एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू तीत उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्याबाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. या मापदंडाद्वारे इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे, असे स्पष्ट प्रतिपादन नाशिक येथे आयोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या भाषणात केले. तसेच, साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ती ऐतिहासिक कादंबरी कशी ठरेल, असा प्रश्नही डॉ. नारळीकर यांनी उपस्थित केला.
एखादी विज्ञानकथा आणि कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल. अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीतही मी असेच परीक्षण करेन. म्हणून जरी साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ती ऐतिहासिक कादंबरी कशी ठरेल? असा प्रश्न विचारत डॉ. नारळीकर यांनी, अशा कादंबरीला कमीच लेखले पाहिजे, असे स्पष्ट केले आणि विज्ञान साहित्याप्रमाणेच ऐतिहासिक साहित्याच्या मूल्यमापनाची गरज व्यक्त केली.
नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटी येथील कुसुमाग्रज नगरीत शुक्रवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकृतीच्या कारणामुळे डॉ. नारळीकर प्रत्यक्ष संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मंचावर त्यांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकवण्यात आली. या अध्यक्षीय भाषणात डॉ. नारळीकर म्हणाले, आपण जेव्हा विज्ञानसाहित्याचे मूल्यमापन करतो, तेव्हा ज्या विज्ञानावर ते आधारलेले आहे ते पण तपासतो. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्टय़ा नसतात. उत्कृष्टतेचे निकष लावले तर फारच कमी कथा त्या निकषांवर खऱ्या उतरतील. विज्ञानकथेतील विज्ञान आजच्या विज्ञानाच्या कांकणभर पुढेच गेलेले असले तरी चालेल, हे आधीच मान्य केले आहे. पण, असे पुढे गेलेले विज्ञान गोष्टीच्या कथानकात चर्चिले गेले असावे, म्हणजे या नव्या विज्ञानाची पार्श्वभूमी लेखकाच्या दृष्टिकोनातून वाचकांपर्यंत पोहोचते. परंतु अनेक विज्ञानकथांमध्ये विज्ञानाचे मूळ नियम कारण न देता हवे तसे बदलण्यात येतात, याबाबतही डॉ. नारळीकर यांनी खंत व्यक्त केली.
या वेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक कादंबरीकार विश्वास पाटील, प्रमुख अतिथी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ, मराठी भाषा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, शुभांगिनी राजे गायकवाड, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आदी उपस्थित होते.
निकृष्ट विज्ञानकथा या भयकथा..
निकृष्ट विज्ञानकथांवर डॉ. नारळीकर यांनी आपल्या भाषणातून कठोर प्रहार केला. ते म्हणाले, काही निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा असतात. अशा कथा विज्ञानकथेला मारकच म्हटल्या पाहिजेत. कारण त्या वाचताना विज्ञान एक अनाकलनीय पण भीतीदायक विषय आहे, असे वाचकाला वाटते. जगात अनेक संहारक शस्त्रे आहेत. त्यांच्यापासून मानवतेला धोका स्पष्ट करणारी उत्तम विज्ञानकथा असू शकते. तसेच काही भुताखेतांच्या भयकथा अंधविश्वासाला खतपाणी घालतात, हे योग्य नाही, याकडेही डॉ. नारळीकर यांनी लक्ष वेधले.
समीक्षकांना आव्हान..
माझ्या कथेतील पात्रे खूप इंग्रजाळलेली आहेत, अशी काही समीक्षकांची तक्रार आहे. या समीक्षकांना माझे इतकेच म्हणणे आहे की, त्यांनी इंग्रजी शब्दांचा उल्लेख न करता दिवसभर मराठी बोलून दाखवावे. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आले, तर आपली भाषा विकसित होते. आज शुद्ध समजले जाणारे अनेक शब्द कधीकाळी बाहेरूनच आले होते, याकडे लक्ष वेधत त्यांनी शब्दांवर आक्षेप घेत कार्यक्रम उधळून लावणाऱ्यांचा अप्रत्यक्ष समाचार घेतला.
खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांत फरक..
खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांनादेखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते. ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही, याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे,’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही, अशी खंतही डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली.
मराठी साहित्याकडे पाहिले की त्यात विज्ञान-साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. – जयंत नारळीकर