काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचे प्रतिपादन

राज्यात सत्ताधाऱ्यांविषयी सर्वसामान्यांमध्ये पसरलेली नाराजी पाहता मध्यावर्ती निवडणुका निश्चित असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी योग्य तयारी केल्यास नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथील काँग्रेस कार्यालयात रविवारी शहर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक डॉ. पाटील, प्रदेश सरचिटणीस मुझफ्फर हुसेन, चिटणीस अविनाश रामिष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेळी सर्वानी गटबाजी व मतभेद टाळण्याचे आवाहन केले. आगामी महापालिका निवडणूक तयारीच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीत शहरातील पाच ब्लॉक अध्यक्षांवर अधिक जबाबदारी टाकण्यात आली. ब्लॉक अध्यक्षांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नगरसेवकांची तसेच इच्छुकांची सर्व प्रकारची माहिती १० दिवसांत आपल्यापर्यंत पोहचवावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. १० ऑगस्टपर्यंत मतदारांची यादी देण्याची सूचनाही त्यांनी केली. महापालिका निवडणुकीआधी अजून एकदा तयारीसंदर्भात बैठक घेण्यात येईल. पक्षातर्फे आयोजित बैठकांना जे पदाधिकारी तीन वेळा अनुपस्थित राहतील, त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजाविण्यात येईल. यापुढे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नकारात्मकता सोडून सकारात्मकतेने विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी शहर अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.