नाशिक : तुम्ही भारतीय ‘परम’ संगणक कसा निर्माण केला, पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले का, अडचणी आल्या का, खर्च किती आला, किती दिवस लागले, संघ कसा तयार केला, परम संगणकाच्या निर्मितीवर अमेरिकेची काय प्रतिक्रिया होती, भविष्यातील संगणक कसा असेल, ‘एलियन्स’ आहेत का, देव असतो का, भूतं असतात का, स्वतःची आंतरिक प्रेरणा कशी जागृत करावी… असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यानी भारतीय ‘परम’ या सुपर-संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना विचारले. अतिशय सविस्तर उत्तर देत भटकरांनी शिबिरार्थी विद्याथ्यांशी हितगुज केली. निमित्त होते, महिरावणी गावात खांडबहाले कुटुंबियांच्या निवासस्थानी आयोजित संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबिराचे.
हेही वाचा…दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; भाजपच्या माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्याची हत्या
डॉ. किसन महाराज साखरे, आळंदी (देवाची) आणि शिवराम महाराज म्हसकर, पिंपळद (घोलपाचे) यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये महिरावणी गावात संत श्री ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबीर ग्लोबल प्रोस्पेरिटी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केले जाते. शिबिराचा समारोप शास्त्रज्ञ डॉ. भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांना प्रत्यक्ष पाहण्या-ऐकण्याची संधी मिळणार म्हणून मोठ्या संख्येने शिबिरार्थी व पालक उपस्थित होते. डॉ. भटकर हे मुलांमध्ये रमले. भविष्यात तंत्रज्ञान खूप विकसित होईल, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवास आव्हान ठरेल, अशावेळी मानवाने उत्तम शिक्षणाबरोबरच सुसंस्कारित होऊन आपली सद्सदबुद्धी, विवेक जागृत ठेवणे आवश्यक असेल. मानवी मूल्यांवर आधारित असलेल्या इंडियन ज्ञान व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, उद्याच्या जगाला दिशा देण्याचे उत्तरदायित्व भारतीय युवकांवर आहे, असे डॉ. भटकर यांनी सांगितले. आपण नेमके कोण आहोत, आपल्या जीवनाचे नेमके प्रयोजन काय, आपण अर्थपूर्ण जीवन कसे जगू शकतो, स्वतःचे व इतरांचे जीवन सुखमय कसे करू शकतो या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा समग्र विचार सर्वानी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा…मतमोजणीत पारदर्शकतेसाठी धडपड; नाशिक, दिंडोरीतील उमेदवारांच्या हाती यंत्राचे अद्वितीय क्रमांक
विद्यार्थी व पालकांनी शिबिरातील विविध अनुभव कथन केले. शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले. ‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह, आयटीतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले, कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात विद्यार्थ्यांना योगासन-प्राणायाम, बोधकथा, स्तोत्र, श्रीमदभगवद्गीता, वारकरी पारंपरिक चालीतील अभंग, भूपाळ्या व गौळणी, संस्कृत-संभाषण, शास्त्रीय संगीतातील अलंकार, टाळ, ठेका, संवादिनी, मृदंग व संगणक-शिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.