आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन
पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून खेळातील नैपुण्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण आणि कौशल्यास चालना मिळण्यासाठी तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याकरिता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
हेही वाचा >>>नाशिक : वन्यजीवांचे अवयव विकणाऱ्या दुकानदाराविरुध्द कारवाई
येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील मैदानात आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गावित यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात अभ्यासात हुषार विद्यार्थ्यांची आश्रमशाळांमधून निवड करून त्यांच्यासाठी सुट्टीच्या दिवशी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून गणित, विज्ञान व इंग्रजी याविषयांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती देण्यासाठी १८००२६७०००७ हा मदतवाहिनी क्रमांक सुरु करण्यात आला असून या क्रमांकावर शैक्षणिक योजनांसोबतच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गावित यांनी यावेळी दिली.