नंदुरबार : आम्ही कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. कधीही सत्तेचा माज केला नाही.अडलेल्या-नडलेल्या प्रत्येकाच्या मदतीसाठी माणूसकीचा हात दिला. माणूस हिच माझी जात आणि माणूसकी हाच माझा धर्म आहे. नंदुरबारकरांशी माझे माणूसकीचे नाते आहे. मी कधीही दलाल, ठेकेदार पोसले नाहीत. माजी मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी आदिवासींसाठी असलेल्या योजनातंर्गत गायी वाटप करतांना त्यात पैसे घेतले. या प्रकाराची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणीदेखील केली आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार येथील सुभाष चौकात आयोजित आभार सभेत केला.
विधान परिषदेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमच चंद्रकांत रघुवंशी यांचे नंदुरबारमध्ये आगमन झाले. त्यानिमित्त सुभाष चौकात सभा घेण्यात आली. याप्रसंगी पालघरचे राजेंद्र गावित, आमशा पाडवी, मंजुळा गावित या आमदारांसह शिवसेना (एकनाथ शिंदे) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, विजय पराडके आदी उपस्थित होते. आमदार रघुवंशी यांनी, खोटे बोलुन कोणीही जास्त दिवस जनतेची दिशाभूल करु शकत नाही, अशी विरोधकांवर टीका केली. आम्ही जनतेचे काम करतो. ठेकेदार पोसत नाहीत. ३० वर्ष आमदार असणाऱ्यांनी शहराच्या विकासात काय योगदान दिलेस याचे आत्मचिंतन करावे. आता पालिका निवडणूकीसाठी शहरातील गल्लोगल्लीत जावून नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत असले तरी ते खोटे असल्याचे जनतेला माहित असल्याने प्रतिसाद मिळत नाही. कोणीही सत्तेचा माज करु नये. सत्तेचा माज करुन आम्हाला माजी हिणवणाऱ्यांच्या परिवारातच आज सर्व माजी झाले आहेत, असे टिकास्त्र रघुवंशी यांनी गावित परिवारावर केले.
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिलेला शब्द पाळला. नंदुरबार-धुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधकांना पराभूत करुन शिवसेनेचा भगवा फडकविणार, असा विश्वास आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केला. ३१ मार्च रोजी नंदुरबारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार आमश्या पाडवी यांनी, , चंद्रकांत रघुवंशी तीन वर्षे नव्हे तर, नऊ वर्ष आमदार राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे आज जिल्ह्यात दोन आमदार झाले असून येत्या काळात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे नमूद केले. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी नंदुरबार जन्मभूमी असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. चंद्रकांत रघुवंशी नशिबान असल्याचेही ते म्हणाले. आमदार मंजुळा गावित यांनी आमचे नेते आधी काम करतात मग बोलतात, असा दावा केला. जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनीही विरोधकांवर टीका केली. सभेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव कदम यांनी केले.
चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्यां नंदुरबारमध्ये आगमन झाल्यानिमित्त नंदुरबारकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ४० जेसीबी उभे करुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. गगनभेदी फटाक्यांची आतषबाजी, आदिवासी नृत्य पथक आणि गाण्यांनी नंदुरबार दणाणून गेले.