मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. विनय सहस्रबुद्धे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्व समग्र होते. घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी यापुरतेच त्यांना सीमित ठेवण्यात आले. पाणी, ऊर्जा, जलमार्ग, कृषी, आर्थिक, पर्यावरण, सामाजिक न्याय, राष्ट्रवादी अशा विविध विषयांवर त्यांनी मूलभूत विचार मांडले. त्यामुळे त्यांचे समग्र विचार कृतीत उतरवून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलतत्त्वे प्रत्यक्ष कृतीत जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात येणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. देशाचे ऐक्य संस्कृतीतून निर्माण झाले असून सध्या सर्वत्र कृत्रिम भेद निर्माण केले जात असल्याचे मत डॉ. सहस्रबुद्धे यांनी मांडले. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी डॉ. आंबेडकर यांनी भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे मूलगामी चिंतन केल्याचे नमूद केले. बाबासाहेबांनी जन्मभर समाजातील वंचित, शोषित, पीडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. तेच काम २६ वर्षांपासून मुक्त विद्यापीठ करत आहे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ५० लाख वंचितांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. प्रवीण घोडेस्वार संपादित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. सहस्रबुद्धे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल विभागाच्या वतीने दिला जाणारा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रुपये २१ हजार या स्वरूपात डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते देण्यात आला. जालना येथील ग्रामीण साहित्यिक विजय जाधव यांना ‘दाखला’ या कथालेखनाबद्दल सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रुपये २१ हजार रुपये असा बाबुराव बागूल कथालेखक पुरस्कार दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाने दिलेल्या पुरस्कारामुळे आपले बळ वाढल्याची भावना पुरस्कारार्थीनी व्यक्त केली. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे हेही उपस्थित होते.
दुपार सत्रात ‘इतर मागासवर्गीयांसाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. यात ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी ओबीसींच्या आजच्या सर्व चळवळींना डॉ. आंबेडकरांचे विचार ऊर्जा देत असल्याचे सांगितले. भारतीय राज्यघटनेच्या ३४० व्या कलमान्वये ओबीसींना सामाजिक न्यायासाठी आरक्षण देण्याची तरतूद बाबासाहेबांनी केल्याचेही नरके यांनी सांगितले.

Story img Loader