नंदुरबार : मंदिरांमध्ये अनेक जण तोकडे कपडे परिधान करुन प्रवेश करत असल्याने मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी येथे झालेल्या पहिल्या महराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात नंदुरबार आणि जिल्ह्यातील मंदिरांमध्ये लवकरच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील श्री दंडपाणेश्वर संस्थानात झालेल्या या अधिवेशनास जिल्ह्यासह परिसरातील ८५ मंदिरांचे सुमारे १६१ विश्वस्तांसह पदाधिकारी तसेच हिंदू जनजागृती समितीचे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिरांचे पावित्र्य राखण्याविषयी या अधिवेशनात चर्चा करण्यात आली. तोकड्या कपड्यांमुळे मंदिरांचे पावित्र्य नष्ट होत असल्याचा विषय मांडण्यात आला. त्यामुळे वस्त्रसंहिता पाळण्याचे ठरविण्यात आल्यावर उपस्थितांनी त्यास पाठिंबा दिला. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि साक्री तालुक्यातील काही मंदिरांमध्ये लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार आहे. यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. अधिवेशनास हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर, उद्योगपती किशोरभाई वाणी, मनुदेवी न्यासचे अध्यक्ष चौधरी, उध्दव महाराज, खगेंद्र महाराज, हर्षद पाठक, प्रा. डॉ. सतीश बागूल आदींसह नंदुरबार,तळोदा, शहादा, नवापूर, प्रकाशा, साक्री आणि दोंडाईचा परिसरातील मंदिरांचे पुजारी, विश्वस्त उपस्थित होते. उपस्थित होते.
वस्त्रसंहितेचे स्वरुप
मंदिरात वस्त्रसंहिता म्हणजे भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना कोणते कपडे परिधान करावे आणि कोणते टाळावे यासंबंधीचे नियम असतात. वस्त्रसंहितेत पुरुषांनी पारंपरिक धोतर, पायजमा-कुर्ता किंवा साधा, सुस्थितीत असलेला संपूर्ण अंग झाकणारा पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. महिलांसाठी साडी, सलवार, कुर्ता, पंजाबी पेहराव किंवा पारंपरिक वस्त्र वापरावे. अशोभनीय तोकडे कपडे, पारदर्शक किंवा अतिशय घट्ट कपडे, धार्मिकदृष्ट्या तेढ निर्माण होईल अशी प्रतिमा किंवा वाक्य असलेले कपडे परिधान करु नयेत.
दिवसेंदिवस पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण वाढत आहे. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य टिकविणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये प्रथमच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर न्यास अधिवेशनात घेण्यात आला आहे. प्रा.डॉ. सतीश बागुल ( हिंदू जनजागृती समिती)