नाशिक – केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. शहा यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत ड्रोन उड्डाणास प्रतिबंध घालण्यात आहे.
शहा यांच्या सुधारित दौऱ्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. नंतर हेलिकॉप्टरने ते मालेगाव तालुक्यातील अजंग येथे व्यंकटेश्वरा सहकारी वीज आणि कृषी प्रक्रिया लिमिटेडतर्फे आयोजित सहकार परिषद आणि विविध कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत.
या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ना उड्डाण क्षेत्र अर्थात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे. या बाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले. उपरोक्त कालावधीत कोणत्याही प्रकारचे ड्रोन (मानवरहित विमान), पॅरा ग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॉटएअर बलून्स, हलकी विमाने, आदी तत्सम हवाई साधने सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय उड्डाण, वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
उल्लंघन झाल्यास कारवाई जिल्ह्यातील (ग्रामीण) ड्रोन चालक व मालकांनी बुधवार ते शुक्रवार या कालावधीत ड्रोनचे उड्डाण करू नये. तसेच ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रीकरणाच्या परवानगी बाबतचे संपूर्ण अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम, भारतीय विमान कायदा आणि अन्य प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.