लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: सुरुवातीला रिमझिम स्वरुपात कधीतरी हजेरी लावणारा पाऊस महिनाभरापासून गायब आहे. यंदाच्या हंगामात आजतागायत मुसळधार पावसाची अनुभूती शहरवासीयांसह अनेक भागास मिळालेली नाही. ऐन पावसाळ्यात अनेक नद्या व नाल्यांचे पात्र कोरडे आहे. शहरातून मार्गस्थ होणारी गोदावरी पूरपाणी दूर, पण दूथडी भरूनही वाहू शकली नाही. पावसाअभावी पिके करपली. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर आजही कायम आहेत. घोंघावणाऱ्या दुष्काळाची भीषणता परतीच्या पावसावर ठरणार आहे.
हिवाळा व उन्हाळ्यात होणाऱ्या अवकाळीने हवामानातील बदल स्थानिक पातळीवर अनेकदा दिसले आहेत. मागील काही वर्षात पावसाचा हंगामही काहिसा उशिराने सुरू व्हायचा. यंदा अल निनोच्या प्रभावाने तो इतका पुढे ढकलला गेला की, हंगामाच्या अखेरपर्यंत पावसाचा थांगपत्ता लागत नाही. ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारपणे ७४१ मिलीमीटर पाऊस होतो. या वर्षी हे प्रमाण आहे, केवळ ३९९.२ मिलीमीटर. म्हणजे सरासरी पावसाच्या ५३.८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. दिंडोरी वगळता एकाही तालुक्यात सरासरी इतका पाऊस झालेला नाही. मालेगाव (५६.९), बागलाण (६४.९), कळवण ( ७०.१), नांदगाव (४४.९), सुरगाणा (६९.४), नाशिक (४८.१), दिंडोरी (१०२.५), इगतपुरी (४८.१), पेठ (६७.६), निफाड (६०.५), सिन्नर (४५.२), येवला (५६.५), चांदवड (४३.६), त्र्यंबकेश्वर (६०) आणि देवळा (५२.४) टक्के अशी पावसाची स्थिती आहे. निम्म्या जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून पाऊस झालेला नाही. पावसाअभावी अनेक भागात खरीपाची पेरणी वाया गेली. काही भागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना लागवड करता आली नाही.
हेही वाचा… बक्षिसाचे आमिष दाखवित वृध्दाची फसवणूक
जिल्ह्यातील अनेक भागात तीन ते चार आठवड्यांपासून उन्हाळ्यासारखी स्थिती आहे. पावसाचे कुठेही चिन्हं नाहीत. जिल्ह्यातील ९२ पैकी सुमारे ५४ मंडलात २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. गतवर्षी पूर्णपणे वेगळे चित्र होते. ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक ८८३ मिलीमीटर म्हणजे ११९ टक्के पाऊस झाला होता. धरणे तुडूंब झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. सर्वच नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र विपरित स्थिती आहे. पावसाअभावी गोदावरी दुथडी भरून वाहू शकली नाही. ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले कोरडे दिसतात. धरणांची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांची ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. त्यामध्ये सध्या ४३ हजार ८७५ दशलक्ष घनफूट म्हणजे ६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ९५ टक्के होते. म्हणजे सर्वच धरणे तुडुंब भरलेली होती. यावेळी पिण्यापुरतीच पाण्याची उपलब्धता होईल अशी स्थिती आहे.
हेही वाचा… वाहतूक नियोजनाअभावी बालकाचा मृत्यू; मालेगावात विविध संघटनांचे आंदोलन
दुष्काळाचे संकट गडद झाले असताना हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू होत आहे. परतीच्या पावसाने अनेकदा जोरदार हजेरी लावलेली आहे. तीन महिने हुलकावणी देणारा पाऊस निरोप घेताना दर्शन देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण त्यावर दुष्काळाची तीव्रता निश्चित होणार आहे.
घाटमाथे प्रतिक्षेत
इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर हे मुसळधार पावसाचे तालुके म्हणून ओळखले जातात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील या भागात काही दिवस तसा पाऊस झाला होता. परंतु, नंतर तो गायब झाला. परिसरात पाण्याखाली बुडालेली भाताची शेती, दुथडी भरून वाहणारे नदी-नाले, धुक्यात हरवलेली वाट असे पावसाळ्यातील चित्र असते. मात्र, या चारही तालुक्यात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद होणाऱ्या इगतपुरीत सरासरीच्या निम्म्याहून कमी पावसाची नोंद आहे. इतरत्र वेगळी स्थिती नाही.
मनमाडकर उकाड्याने हैराण
गेल्या तीन दिवसात मनमाडचे कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. त्यामुले उकाडा वाढला आहे. साथीचे आजार बळावत आहेत. ऐन पावसाळ्यात उकाडा सहन करावा लागत असल्याने ‘ऑक्टोबर हीट’ श्रावणातच अनुभवावी लागत आहे.