जळगाव: तालुक्यातील शेळगाव येथील धरणात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
शेळगाव येथे रमेश कोळी (६०) हे पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. ते शेतमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी पहाटे कोळी हे शेळगाव धरणानजीकच्या अन्नपूर्णा माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ते धरणात हातपाय धुण्यासाठी गेले असता, त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात पडले.
हेही वाचा… अफवांवर विश्वास ठेवू नका – घोटी, वाडीवऱ्हे पोलिसांचे आवाहन
दोन दिवसांपासून कोळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांच्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. सोमवारी सकाळी शेळगाव येथील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सुभाष कोळी हे धरणात पोहण्यासाठी गेले असता त्यांना रमेश कोळी यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी तातडीने गावातील ग्रामस्थांसह नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह रवाना केला.