नंदुरबार – पोलीस दलाने हाती घेतलेल्या अंमली पदार्थमुक्त जिल्हा आणि बालविवाह रोखण्यासाठीच्या अक्षता मोहिमेसाठी मदतवाहिनी उपलब्ध जारी केली आहे. जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त बनवण्यासोबत बालविवाहाचे आव्हान पेलण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले असून याच अनुषंगाने कठोर कारवाईचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या संकल्पनेची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात गांजा, अफु आदी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तंबाखूजन्य व अंमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होऊन विविध प्रकारचे विकार जडतात. अंमली पदार्थांच्या सेवनाने मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होऊन त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयांवर होत असतो. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – नाशिक : महिनाभरात नऊ हजार विद्यार्थ्यांना वैधता, जात प्रमाणपत्रांचे वाटप

बालविवाह व अंमली पदार्थांसंदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ ९०२२४५५४१४ अथवा अथवा टोल फ्री ११२ या क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील. हे क्रमांक २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील. यातून ही चळवळ अधिक व्यापक आणि लोकाभिमुख करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

अक्षता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग अपेक्षित

जिल्ह्यात बालविवाह ही गंभीर समस्या असून बाल विवाहामुळे बालकांच्या विशेषत: मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समूळ उच्चाटन झाले तर कुपोषणासारख्या समस्यादेखील कमी होण्यास मदत होईल. या भावनेने नंदुरबार पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमात गावातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन बाल विवाह रोखण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी पोलीस दलाची अपेक्षा आहे. महिलांसंबंधी घडणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या व अन्य अत्याचाराच्या घटनांविषयी सजगता निर्माण व्हावी यासाठी गाव पातळीवर काम करणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचाही सहभाग या उपक्रमात घेण्यात आला आहे. समाज घटकातील प्रत्येकाने जबाबदारी ओळखून गावात बाल विवाह प्रतिबंधाबद्दल जनजागृती करून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी केले.

हेही वाचा – नाशिक : ठाकरे गटातील आमदार पुत्राच्या लग्न सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

पालकांनी अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा यांचा बालविवाह न करता त्यांना उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे, असे सांगण्यात आले आहे.