लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर नाशिक पोलिसांनीही या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढत अटक सत्र राबवले. मुंबई आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भूषण पाटील, अभिषेक बल्लाळ यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना बुधवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संजय शिंदे यालाही तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
आणखी वाचा-EVM बद्दल शंका आहे का? साशंकता दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाची प्रात्यक्षिके
अमली पदार्थ तस्करीत नाशिकचे नाव ललित पाटील प्रकरणामुळे पुढे आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नाशिकसह सोलापूर येथेही कारवाई केली. या प्रकरणात मुंबई, पुणे पोलिसांनी अभिषेक बल्लाळ, भूषण पाटील यांना ताब्यात घेतले होते. नाशिक पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला असून नाशिक येथील गोदामातून अमली पदार्थही ताब्यात घेतले. गोदाम कोणाचे, अमली पदार्थ कोठून आणले जात होते, या गोदामाचा मालक कोण, यासह गोदामाशी संबंधित चौकशीसाठी नाशिक पोलिसांनी दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले. काही दिवसांपूर्वी संजय शिंदे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बुधवारी न्यायालयाने भूषण, अभिषेक यांना पोलीस कोठडी सुनावली