हैदराबादहून आणलेला तब्बल एक कोटीहून अधिक किमतीचा १३ क्विंटल गांजा चांदवडच्या मंगरूळ नाक्यावर पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली. इतक्या मोठय़ा प्रमाणात साठा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आंध प्रदेशच्या हैदराबाद येथून आयशर टेम्पो मोठय़ा प्रमाणात गांजा घेऊन नाशिककडे येत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, चांदवड पोलीस निरीक्षक अनंत मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. चांदवडच्या मंगरूळ नाक्यावर हा टेम्पो आला असता गाडीत काय आहे अशी विचारणा पोलिसांनी केली. तेव्हा वाहनचालक चक्रधर मोहन व अहमद शेख यांनी डाळिंब असल्याचे उत्तर दिले.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी संशयितांना माल दाखविण्यास सांगितले. गाडीच्या दुसऱ्या कप्प्यात डाळिंबाचे काही रिकामे तसेच भरलेले खोके ठेवण्यात आले होते. त्यांच्या खालील बाजूला गोण्यांमध्ये गांजा लपवला होता. छाननीत ही बाब उघड झाल्यावर संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर संशयितांनी उपरोक्त घटनाक्रमाची माहिती दिली.
हैदराबाद येथे नियमित माणसाकडून हा माल खरेदी करण्यात आला. नाशिकच्या आधी सिन्नर परिसरात तो उतरवायचा होता, अशी कबुली संशयितांनी दिली. पोलिसांनी टेम्पोत १३ क्विंटल गांजा असल्याचे सांगितले.
बाजारात त्याची किंमत एक कोटी ३५ लाखहून अधिक आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा