धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रकार अधुनमधून होत असताना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकून ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक कोटी २५ लाख रुपयांचा गांजा हा अमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल जप्त केला. साक्री तालुक्यातील देशशिरवाडे शिवारातील शेतात रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे.
मोहन साबळे ( रा.पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे) हा त्याच्या देशशिरवाडे शिवारातील शेतात गुंगीकारक गांजासदृश अमली पदार्थ बाळगून असून तो एका वाहनातून अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्तरित्या पथक तयार करुन रात्री द साबळे याच्या शेतातील घराजवळ गुप्त पद्धतीने पाहणी केली. खात्री झाल्यावर छापा टाकला. पोपट बागूल (४०, रा.रायकोट, ता. साक्री, जि. धुळे) यास ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता शेत आणि घटनास्थळी निदर्शनास आलेला गांजा मोहन साबळे याच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलिसांना एक कोटी १९ लाख २३ हजार ९२० रुपये किंमतीचा ५४२.७३ किलो गांजा, सहा लाख रुपयांचे ट्रॅक्टर व ट्रॉली.असा सुमारे एक कोटी २५ लाख ९२० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
याप्रकरणी पोपट बागूल, मोहन साबळे यांच्याविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.