नाशिक – पंचवटी येथील हत्येचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पाच तासाच्या आत संशयिताला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एक) यश आले.पंचवटी परिसरातील खासगी जागेत बुधवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळला होता. पंचवटीचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांसह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. मयताचे नाव शांतीलाल ब्राम्हणे असल्याचे समजले. त्याच्या डोक्यावर जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी केली असता एक जण शांतीलालशी बोलताना दिसला.

स्थानिक गुन्हे शाखेने संबंधिताची माहिती काढली असता त्याचे नाव संतोष अहिरे (रा. पेठफाटा) असल्याचे समजले. गुलाबबाग भागात पोलिसांनी पथक पाठवत संशयित संतोष याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शांतीलाल आणि संतोष हे दोघे मित्र होते. दोघे मंगळवारी रात्री पंचवटीतील एका मोकळ्या जागी दारू पित असताना मद्याच्या नशेत दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. शांतीलालने संतोषच्या नाकावर मारले. त्यामुळे संतोषने रागाच्या भरात शांतीलाल यास खाली पाडून डोक्यात दगड घातला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली. संशयिताला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Story img Loader