पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे किल्ल्यांची दुरवस्था
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे सिन्नरजवळील डुबेरे गडावर स्वच्छता मोहीम राबविली. दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले असून ग्रामस्थ त्याचे संवर्धन करत असल्याचे या वेळी ठळकपणे पुढे आहे.
नाशिक-सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर डुबेरे गाव आहे. पहिले बाजीराव पेशवे यांचा डुबेरे गावातील बर्वे वाडय़ात जन्म झाला होता. त्यामुळे या गावाचे नाव देशभरात पोहोचले आहे. या गावाजवळच डुबेरे गड आहे. पूर्वी डुबेरे गाव या गडाच्या पायथ्याशी होते. गडावर जाण्यासाठी ५५० पायऱ्या आहेत. पण, त्यातील अनेक तुटल्या आहेत. लोखंडी रेलिंगही तुटायला आले आहेत. पूर्वी हा किल्ला असल्याचे अनेक पुरावे गडावर आजही दृष्टिपथास पडतात. गडावरील पाण्याची टाकी, धार्मिक स्थळे, बांधकामांचे अवशेष पाहिल्यावर किल्ल्याची ओळख होवू लागते. गडावर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. गडाच्या पायथ्याशी पॅगोडासारख्या आकारात नागेश्वर मंदिराची उभारणी केली गेली आहे. दुर्लक्षित राहिलेल्या गडावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, उमेश कुमार, सागर बनकर यांच्यासह १५ ते २० सदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. पायऱ्यांचे तुटलेले दगड बाजूला करण्यात आले. गडावरील प्राचीन तळ्याला कुंपण करण्यात आले. मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. गडाच्या माथ्यावर जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.
गडावरून उतरल्यानंतर सदस्यांनी बाजीराव पेशवा यांच्या जन्मस्थानी बर्वे वाडय़ास भेट दिली. एक बुरूज असणारा हा एकमेव वाडा असावा. या गावात शंभर वर्षे जुना भोपळ्याचा वेल नव्हे तर वृक्ष आहे. हा वृक्ष पाहण्यासाठी जगभरातून अभ्यासक या ठिकाणी येत असतात. अभ्यासकांनी हे झाड दक्षिण अमेरिकेतील असल्याचे म्हटले आहे. ‘क्रिसेन्सिया क्यूजेटा’ हे त्याचे शास्त्रीय नाव असून ‘कॅलेब्रश ट्री’ म्हणूनदेखील ते ओळखले जाते. या वृक्षांच्या पळांचा तंतुवाद्य बनविण्यासाठी उपयोग होतो. ऐतिहासिक ठेवा जपणाऱ्या किल्ल्याकडे कोणाचे लक्ष नाही. गडावर जाण्यासाठी ना धड रस्ता आहे, ना धड पायऱ्या. वेडय़ा बाभळीने हा परिसर अगदी हिरवागार बनला आहे. या वनराजीमुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाटही मोठय़ा प्रमाणात ऐकावयास मिळतो.
अभियान राज्यभर फोफावणे गरजेचे
जिल्ह्य़ातील इतर दुरवस्था झालेल्या गड आणि किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गडप्रेमी तरुणांची गरज आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या गडांची सध्याची जीर्ण स्थिती सुधारण्याची मानसिकता सरकारी पातळीवर नाही. त्यासाठी सामाजिक आणि गडकिल्ल्यांवर भ्रमंती करणाऱ्या युवकांना एकत्रित करण्याची गरज असल्याचे मत या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यासाठी अशा तरुणांची काही पथके तयार करण्याचा आपल्या संस्थेचा मानस असल्याचे येथील स्वयंसेवी संस्थांनी सांगितले.