लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण काँक्रिटीकरण सुरू असताना आता विद्रुपीकरणही होत आहे. नळजोडणी आणि बिघाड दुरुस्तीसाठी रस्ते खोदले जात आहेत. शिवाय, मुख्य चौक, रस्त्याच्या मधोमध शुभेच्छांसह इतर जाहिरातींसाठी फलकांद्वारे, तसेच भूमिपूजनाच्या नावाने रस्तेही उखडून शहराचे विद्रुपीकरण केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जळगावकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात अमृत पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण योजनांची कामे अजूनही पूर्ण न झाल्याने त्यासाठी रस्ते खोदावे लागत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, सर्वत्र या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यात लोकप्रतिनिधींनी थेट रस्त्यांची पाहणी करून मक्तेदाराने तयार केलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर प्रश्न उपस्थित केला होता, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही यावर लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले होते. महापालिका महासभांमध्येही रस्तेप्रश्नी चांगलाच गाजतो.
हेही वाचा… भुसावळ तालुक्यात तरुणाचा खून; संशयिताला अटक
मक्तेदारांकडून रस्त्यांचे थातूरमातूर काम सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामे करण्याचा वेगही धीमाच असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. उपनगरांतील रस्त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून शहरातील सुमारे दहा रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, या रस्त्यांचे काम व्यवस्थित होत नसून झालेल्या रस्त्यांवर काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत आहेत. रस्त्यांची कामे व्यवस्थित होत नसल्याने जळगावकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा… नाशिक: शिवसेनेतील उठावाला अजित पवार जबाबदार, गिरीश महाजन यांचा आरोप
महापालिका प्रशासनाने याबाबत हात वर केले असून, काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याचे सांगत आहे. अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्या अंथरल्या गेल्या आहेत. त्यावरून नळजोडणीसाठी रस्ते खोदले जात आहेत. अनेक ठिकाणी काही ना काही कारणांसाठी रस्ते खोदले जात आहेत. मात्र, त्यानंतर ते बुजविण्याची तसदीही घेतली जात नाही. शिवाय, काही ठिकाणी खड्डे बुजविताना मातीचा वापर केला जात आहे. गटारांचीही दुरवस्था झाली आहे. त्यातील सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असते. परिणामी रस्त्यांतील खड्ड्यात पाणी साचून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा… नाशिक : जिल्हा नियोजन निधी वाटपावरून पालकमंत्री-विरोधकांमध्ये नवे वाद
भोईटेनगर ते पिंप्राळा मुख्य चौकातील सोमाणी व्यापारी संकुलादरम्यान रस्त्याच्या कामाला ३८ कोटींच्या निधीतून मंजुरी मिळाली आहे. पिंप्राळा उपनगरातील सुमारे लाखावर रहिवाशांना शहरात जाणाऱ्या या मुख्य रस्त्याचे काही दिवसांपूर्वी थाटात आणि गाजावाजा करीत भूमिपूजन झाले. मात्र, अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. भूमिपूजनावेळी बजरंग बोगदा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकदरम्यान रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे पिंप्राळा उपनगरातील रहिवाशांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे.
जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते आहे. अगोदरचा रस्ता चांगला होता, अशा संतापजनक प्रतिक्रिया वाहनधारकांसह पादचाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. फक्त श्रेयासाठी भूमिपूजनाचा आटापिटा केला जात असल्याचे बोलले जात आहे. शहरातील मुख्य चौक, रस्त्याच्या मधोमध तथा काही वीजखांबांवर, तसेच विविध भागांत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठे फलक लावलेले दिसून येतात. काही जण स्वतःसह मित्रमंडळींच्या शुभेच्छांचे फलक सर्रासपणे लावलेले दिसून येतात. त्यामुळे या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येत आहे.