नाशिक : महावितरण कंपनी शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती तसेच पावसाळापूर्व कामे करणार असल्याने या दिवशी महानगरपालिकेच्या गंगापूर आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… नाशिक: होळकर पुलाखालील यांत्रिकी दरवाजाचे काम लवकरच; बंधाराही हटविणार; गोदावरीतील पाणी फुगवटा कमी करण्यासाठी निर्णय

हेही वाचा… नाशिक: अनधिकृत नळजोडणीधारकांना अभय; जोडणी अधिकृत करण्याची मुभा; पाणीपट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड

मनपाच्या गंगापूर धरण उपसा केंद्र येथे महावितरण कंपनीच्या सातपूर आणि महिंद्रा या दोन रोहित्रावरून उच्च दाबाचा वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. या उपसा केंद्राद्वारे मनपाच्या बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना पाणी पुरवठा केला जातो. महावितरण कंपनीच्या वतीने मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती व पावसाळापूर्व कामे (सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण पर्यंत) करण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. मनपाच्या मुकणे उपसा केंद्र येथे महावितरणच्या उपकेंद्रातील गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी वीज पुरवठा आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड उपकेंद्रात दुरुस्ती कामांसाठी वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणच्या दुरुस्ती कामामुळे गंगापूर व मुकणे धरणातून महानगरपालिकेला शनिवारी पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळचा कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to electricity supply line repair work water supply going to suspended on saturday for nashik city asj
Show comments