नंदुरबार – स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर तसेच जिल्हा निर्मितीचे रौप्य महोत्सवी वर्ष उलटल्यानंतरदेखील नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील रहिवासी आजही मूलभूत सोयीसुविधांविना मरणयातना सोसत असल्याचे तेलखेडीजवळील कुंड्यापाडा येथील घटनेवरुन उघड झाले. पाड्यापर्यंत रस्ता नसल्याने बांबूच्या झोळीतून नेत असतानाच महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. यानंतर मातेला नवजात शिशूसह रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.
धडगाव तालुक्यातील तेलखेडीजवळील कुंड्यापाडा येथील अलका पावरा (२३) या नऊ महिन्यांच्या गरोदर असल्याने अचानक त्यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्या. यामुळे तत्काळ रुग्णवाहिकेला बोलविण्यात आले. परंतु, घरापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिकेला रस्ताच नसल्याने बांबूची झोळी करुन नातेवाईकांच्या मदतीने रुग्णवाहिकेपर्यंत अलका यांना पोहचविण्यात आले. सुमारे अडीच किमी अंतर झोळीतून नेत असतांना त्यांची रस्त्यातच प्रसुती झाली. सुदैवाने माता व बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा >>>नाशिकवरील जलसंकट तूर्तास टळले – स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता काश्यपीतून बंदोबस्तात विसर्ग
सातपुड्याच्या दुर्गम भागात केवळ रस्ते नसल्याने आजही रस्त्यावरच मातांची प्रसुती झाल्यच्या घटना कित्येकदा घडत असल्याने यामुळे गतिमान शासनाचा दावादेखील फोल ठरत आहे. कुंड्यापाडा येथे १०० पेक्षा अधिक लोकसंख्या असून या पाड्याचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. यामुळे आता आमच्या गावात रस्ता व्हावा, अशी अपेक्षा येथील नागरिक करत असले तरी येथे राजकीय इच्छाशक्तीचादेखील अभाव दिसून येत आहे.
तेलखेडी कुंड्यापाडा येथील महिलेला रस्त्याअभावी बांबूच्या झोळीतून दवाखान्यात घेऊन जात असता रस्त्यातच प्रसुती झाल्याचे समजले. त्या अनुषंगाने माझ्यासह तालुका आरोग्य सहायक राकेश पावरा, आरोग्य पर्यवेक्षिका रेखा बाविस्कर यांनी भेट देऊन चौकशी केली प्रसुतीनंतर मातेला प्राथमिक आरोग्य केंद्र तेलखेडी येथे आणले असून त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.-डॉ.कांतीलाल पावरा (तालुका आरोग्य अधिकारी, धडगांव)
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मिशन ८४ दिवसप्रमाणे सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असून गरोदर मातांचा विशेष पाठपुरावा सुरु आहे.- रेखा बाविस्कर (आरोग्य पर्यवेक्षिका)
रस्ता नसल्याने गरोदर मातांना झोळीतून घेवून जावे लागते. डोंगर चढून पायवाट तुडवावी लागते. याआधीही माझ्या पत्नीची प्रसुती झाली होती, त्यावेळीदेखील झोळीतूनच न्यावे लागले होते. आतादेखील बांबूच्या झोळीतून नेत असतांना रस्त्यातच प्रसुती झाली आहे.यामुळे आमच्या पाड्यापर्यंत रस्ता करण्यात यावा. अशा यातना आम्ही आणखी किती दिवस सोसायच्या ?-आकाश पावरा (रहिवासी, तेलखेडी)