नाशिक: दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने चार ते १५ नोव्हेंबर या कालावधीत रविवार कारंजा, मेनरोड परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
शनिवारपासून १५ नोव्हेंबरपर्यंत संबंधित भागात सकाळी आठ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. मेनरोडकडे जाणारा रस्ता, रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबाद नाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे इतरत्र जावे.
हेही वाचा… नाशिक: परिवर्त मराठी साहित्य परिषदेची तयारी पूर्ण
तसेच सीबीएस, शालिमारकडून जुने नाशिक परिसरात जा-ये करण्यासाठी शालिमार, खडकाळी सिग्नल, दूधबाजार चौक या मार्गाचा अवलंब करावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली, सागरमल मोदी विद्यालय (पे ॲण्ड पार्क), कालिदास कलामंदिर समोरे (पे ॲण्ड पार्क) वाहने उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.