नाशिक : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवण्यासाठी शहरात कार्यान्वित केल्या जाणाऱ्या स्काडा प्रणालीच्या अनुषंगाने शनिवारी पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रासह विविध जलकुंभांच्या ठिकाणी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध जलशुध्दीकरण केंद्र आणि जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रासह विविध जलकुंभात विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. शहरात पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे.

जीर्ण झालेल्या वाहिन्यांमधून पाण्याचा होणारा अपव्यय, अनधिकृत जोडण्या अशी काही कारणे त्यामागे असल्याचे सांगितले जाते. शहरात वितरित होणाऱ्या पाण्याचा काटेकोरपणे हिशेब ठेवण्यासाठी स्काडा मीटर प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. मागील काही महिन्यात पाणी पुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून वारंवार आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर, पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याची धडपड केली जात आहे.

स्काडा प्रणालीशी संबंधित शहरात विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्व विभागातील प्रमुख जलवाहिन्यांमध्ये फ्लो मीटर आणि बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविणे, आंतरजोडणी करणे आदींचा समावेश आहे. तसेच या दिवशी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने विविध विभागात मुख्य जलवाहिन्या, उपवाहिन्या आणि व्हॉल्व्हची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे, गंगापूर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावासाठी ३०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकणे आदी कामे करण्याचे नियोजन केले आहे. व्यापक स्वरुपातील या कामांमुळे शनिवारी शहरात संपूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

Story img Loader