लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे चहुबाजूने टीका होऊ लागल्यावर पोलीस गुन्हेगारी मिटविण्यासाठी चांगलेच आक्रमक झाले असून वेगवेगळ्या कारवायांना वेग देण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरातील दोन गुन्हेगारांना हद्दपार करण्यासह बुधवारी रस्त्यांवर टवाळकी करणाऱ्या तसेच धुम्रपान करणाऱ्या २२३ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, अशी कृती करणाऱ्यांविरूध्द पोलीस आक्रमक झाले आहेत. नाशिकरोड परिसरात शाहिद सय्यद (१९) याच्यावर घरांवर दगडफेक करणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण करुन जबरी चोरी करणे, घातक हत्यार जवळ बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच किरण गुजर पाटील (रा.नाशिकरोड) याच्यावर उपनगर परिसरात घरफोडी करणे, मारहाण करुन विनयभंग करणे असे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई केली आहे. पुढील काळात प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई प्रक्रिया सुरू राहील, असा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, शहर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्यांवर टवाळकी करणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता या मोहिमे दरम्यान १५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
हेही वाचा… वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे यांच्याविरुध्द गुन्हा
शहरातील शाळा, महाविद्यालयापासून शंभर मीटर अंतरावरील ज्या पानटपऱ्यांवर प्रतिबंधित असलेला गुटखा, सिगारेट, तंबाखु विक्री होतांना आढळून आले, अशा पानटपरी चालकांवर आणि ध्रुमपान करणाऱ्या ६६ जणांविरुध्द, याप्रमाणे एकूण २२३ जणांविरुध्द नाशिक शहर पोलीसांनी कारवाई करुन दणका दिला आहे.