धुळे: पाच दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ८२ गावे बाधित झाले असून एकूण २४२.४० हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ४९८ शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे. या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार ६३ टक्के पंचनामे झाले असून लवकरच हा अहवाल मदतीसाठी पाठविला जाणार, अशी माहिती कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कुर्बान तडवी यांनी दिली.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजाच्या आधारे सर्व कृषी व महसूल यंत्रणांकडून पंचनामे सुरु आहेत. आतापर्यंत बाधित क्षेत्रापैकी १५३.४५ हेक्टर क्षेत्रांचे म्हणजेच ६३ टक्के पंचनामे झाल्याची आकडेवारी आहे. त्यानुसार गहू, बाजरी, मका, कापूस, केळी, हरभरा, पपई, डाळींब आणि शेवगा या शेती पिकांचे नुकसान झाल्याचे त्यात समाविष्ट आहे. ही अंतिम आकडेवारी नसून क्षेत्रीय सर्व्हेक्षणानुसार त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल क्षेत्रीय स्तरावरुन आल्यानंतर पुढे तो मदतीसाठी पाठविला जाईल, असे तडवी यांनी सांगितले.
धुळे तालुका- ८.४० हेक्टर क्षेत्र बाधित. ३.१० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
साक्री तालुका- १८९.७० हेक्टर क्षेत्र बाधित. १२५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
शिंदखेडा तालुका- ७.३० हेक्टर क्षेत्र बाधित. ३.२५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
शिरपूर तालुका- ३७ हेक्टर क्षेत्र बाधित. २२.१० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
जिल्ह्यातील बाधित क्षेत्रांचे पंचनामे सुरु असून संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल आल्यानंतर मदतीसाठी तो पाठविला जाईल. – कुर्बान तडवी (जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग धुळे जिल्हा)