नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई सुरू असून आठ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिवाळीत फराळ, मिठाई तयार करण्यासाठी बऱ्याचदा गृहिणी किंवा नोकरदार महिलांकडून दमछाक टाळण्यासाठी बाहेरून खाद्य पदार्थ मागविण्यात येतात. घरगुती खाद्य पदार्थांपेक्षा बाहेरील खाद्य पदार्थांमध्ये भेसळीचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळ रोखण्यासाठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विभागाच्या नाशिक कार्यालयाच्या वतीने दुग्ध व दुग्धजन्य तूप, पनीर आदी अन्नपदार्थांचे २२ नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून ५६३ किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९९५७० रुपये आहे.
हेही वाचा…कांदे-भुजबळ वादाला धार, धमकावल्याप्रकरणी कांदेंविरोधात गुन्हा
वेगवेगळ्या मिठाईंचे ३२ नमुने विश्लेषणासाठी घेत भेसळीच्या संशयावरून २१९ किलोग्रॅमचा साठा, तसेच रवा, मैदा, बेसन, भगर आदी अन्न पदार्थांचे १९ नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून १०९२ किलोग्रॅम साठा जप्त करण्यात आला. याशिवाय चहा, शीतपेय, मसाले आदींचे १० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून १९८२ किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ८७१७३० रुपये इतकी आहे.
हेही वाचा…पक्षाच्या राजीनाम्यानंतरच समीर भुजबळ मैदानात, शिंदे गटाला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, सर्व अन्न पदार्थ विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. नागरिकांनी भेसळ संदर्भातील तक्रारींसाठी १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.