नाशिक : लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी पूजेसह सजावटीत वापरल्या जाणाऱ्या झेंडू, शेवंती, गुलाब व अन्य फुलांची मागणी लक्षणीय वाढल्याने त्यांचे दरही चांगलेच वधारले आहेत. दसरा सणावेळी २०० ते २५० रुपयांना मिळणारी झेंडू फुलांची जाळी दिवाळीत गुरुवारी सकाळी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत पोहोचली होती. परंतु, सायंकाळी आवक वाढल्यानंतर हेच भाव ३०० ते ४०० रुपयांपर्यंत खाली आले होते.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्याची झळ झेंडू फुलांच्या शेतीला बसल्याने नियमित उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याची परिणती दर गगनाला भिडण्यात झाल्याचे चित्र आहे. गोदाकाठावर भरणारा फूल बाजार लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला अर्थात गुरुवारी पिवळ्या व भगव्या रंगाच्या झेंडू फुलांनी बहरला. शहरातील विविध भागात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची दुकाने लावली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेबरोबर हार बनविण्यासाठी या फुलांना विशेष मागणी असते. घर, दुकान सजावटीत त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दीपावलीत मात्र ही फुले महागली आहेत. दसरा सणावेळी २०० ते २५० रुपये जाळी या दराने ही फुले मिळत होती. गुरुवारी सकाळी त्यांचे भाव दुपटीने वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु, दुपारनंतर आवक वाढल्याने भावात काही प्रमाणात घसरण झाली. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.
हेही वाचा…शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका
परतीच्या पावसाने फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दसरा सणावेळी भाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी भिजलेली फुले विक्रीला नेली नव्हती. परतीच्या पावसाने फुल शेतीचे मोठे नुकसान केले. उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्यामुळे दिवाळीत झेंडू फुलांची कमतरता असल्याचे उत्पादक सांगतात. दीपोत्सवात झेंडू, विविध रंगातील शेवंती, गुलाब, पाण्यातील कमळ आदी फुलांना मागणी आहे. सध्या शेवंती २५० ते ३०० रुपये किलो, गुलाबांचा १० फुलांचा गुच्छ ८० ते १२० रुपये, पाण्यातील कमळ प्रत्येकी २० ते ५० रुपयापर्यंत मिळत आहे. झेंडू फुलांच्या दरवाढीमुळे या फुलांचे तयार हारही महागले आहेत.
© The Indian Express (P) Ltd