लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – दुष्काळामुळे शहरवासीयांवर टंचाईचे सावट दाटले असतानाच महापालिकेने पाणी पट्टीत तब्बल १४० टक्के वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर, मलजलापोटी प्रभमच तीन टक्के शुल्क आकारणी होणार आहे. पाणीपट्टी वाढीस राजकीय पटलावरून आजवर सातत्याने विरोध दर्शविला गेला होता. प्रशासकीय राजवटीत हा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केला आहे. दुष्काळामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट आहे. याच काळात नाशिककरांवर हा बोजा टाकण्यात आल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
महानगरपालिकेत स्थायी समितीची सभा झाली. पाणीपुरवठा विभागाने घरगुती, बिगर घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टी दरात वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. तब्बल १४० टक्के ही वाढ असणार आहे. शिवाय नाशिककरांवर पहिल्यांदाच तीन टक्के मलजल शुल्क लावण्याची तयारी करण्यात आली. स्थायी समितीने मान्यता दिल्याने पुढील आर्थिक वर्षापासून ही दरवाढ लागू होईल. यापूर्वी २०१२ मध्ये पाणीपट्टी दरात वाढ करण्यात आली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बेताची आहे. मनपा आयुक्तांनी उत्पन्नाचे नवीन पर्याय शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला. यापूर्वी महापालिकेने सन-२०१२ मध्ये पाणीपट्टी दरात वाढ केली होती. पुढील काळात जेव्हा दरवाढीचा विषय आला, तेव्हा राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे १२ वर्षे जुन्या दरानेच नागरिकांना पाणी पुरवठा सुरु आहे.
आणखी वाचा-संभाजीनगरवासीय आनंदले, नाशिककर दु:खी… जायकवाडीसाठी विसर्गाला सुरुवात
धरणातून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करताना मोठा खर्च येतो. त्या तुलनेत पाणीपट्टी वसूल होत नाही. महापालिकेला ८९ कोटींची अपेक्षा असताना जेमतेम ४० कोटी पाणीपट्टी वसूल होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. घरगुती, बिगर घरगुती व व्यावसायिक या तिन्ही ग्राहकांसाठी पाणी पट्टीत सुमारे १४० टक्के वाढ होणार आहे. तसेच २०२७ पर्यंत प्रत्येक वर्षात ठराविक दरवाढीचा समावेश आहे. पाणी पट्टीचे उद्दिष्ट वर्षाला १४४ कोटी इतके ठेवण्यात आले आहे.
दरवाढ कशी होणार
सध्या प्रति हजार लिटरला पाच रुपये असणारा दर २०२४-२५ या वर्षात १२ रुपये, २०२५-२६ वर्षात १३ व त्यापुढील वर्षात १४ रुपये होईल. बिगरघरगुती सध्या १२ रुपयांवर असणारादर ३० रुपये होईल. त्यापुढील वर्षात अनुक्रमे ३२ व ३५ रुपये असणार आहे. व्यावसायिक पाणीपट्टीसाठी सध्या २७ रुपये (प्रति हजार लिटर) असणारा दर आगामी वर्षात ३५ रुपये होईल. तर २०२५-२६ वर्षात ३७ रुपये आणि २०२६-२७ वर्षात ४० रुपये होणार आहे.
राजकीय दबाव नसल्याचा फायदा
सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. राजकीय दबाव नसल्याने दरवाढीचा विषय मार्गी लावण्यात आला. यंदा कमी पावसामुळे पाणी टंचाईचे सावट आहे. त्याचवेळी ही वाढ करण्यात आल्याने त्याचे राजकीय पातळीवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरवाढीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मौन बाळगले होते. आता हा प्रस्ताव मंजुर झाल्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे.